दोंडाईचा येथील दगडफेक व खुनाचा तपास एलसीबीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 20:38 IST2021-04-02T20:38:15+5:302021-04-02T20:38:38+5:30
संवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त, आरोपीच्या शोधासाठी पथक नियुक्त

दोंडाईचा येथील दगडफेक व खुनाचा तपास एलसीबीकडे
धुळे : अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या जमावाने केलेली दगडफेक, गोळीबारात जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल करताना दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा खून या वेगवेगळ्या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. दरम्यान, दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांनी स्विकारला आहे.
दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्या दोघांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात येवून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य पोलिसांवर हल्ला केला. हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली. यात वारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संतोष लोले, कॉन्स्टेबल संजय चव्हाण, चौधरी, माळी असे पाच कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी वारे यांनी गोळीबार केल्याने यात एकाला दुखापत झाली. गोळीबारातील जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथेही दोन गट समोरासमोर आले. तेथे झालेल्या हाणामारीत शाहबाज शाह गुलाब शाह यांच्या डोक्यात वार केल्याने, त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांर्भिर्य लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अन्य अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली होती.
संवेदनशिल भागात बंदोबस्त
घटनेचे गांभिर्य ओळखून धुळ्यासह मुंबई, जळगाव, नाशिक, नंदुरबार येथून पोेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली असून संवेदनशिल भागात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.
बाभड यांनी घेतला पदभार
दोंडाईचा येथे घडलेल्या प्रकरणानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद इतरत्र उमटू नये म्हणून तातडीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार देखील सोपविला आहे.
तपास एलसीबीकडे
दोंडाईचा येथे घडलेल्या घटनेचे गांभिर्य ओळखून आणि नि:पक्षपातीपणे तपास होऊन संशयित आरोपींना गजाआड करण्यासाठी या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे संवेदनशील प्रकरण सांभाळतील.
पथकाची नियुक्ती
दोंडाईचा पोलीस ठाण्यावर झालेली दगडफेक, पोलिसांवर झालेला हल्ला, शाहबाज शाह यांचा झालेला मृत्यू याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रकरणनिहाय वेगवेगळे संशयित असून त्यांच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.