गांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:41 IST2021-02-01T22:41:26+5:302021-02-01T22:41:44+5:30
अभय कॉलेजच्या परिसरातील घटना

गांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीने पकडले
धुळे : शहरातील अभय कॉलेजच्या परिसरात गांजाची खरेदी-विक्री करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा गांजासह दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गांजाची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. माहिती मिळताच ३१ जानेवारी रोजी दुपारी अभय कॉलेजच्या परिसरात सापळा लावण्यात आला. गांजा विक्रीसाठी आलेला भैय्या उर्फ सचिन प्रकाश चौधरी (३६, रा. शिवकॉलनी, अभय कॉलेजजवळ, धुळे) आणि गांजा विकत घेण्यासाठी आलेला अनिल धिरुभाई मनियार (४०, रा. शंकर टेकडी, पाण्याच्या टाकीजवळ, गल्ली नंबर २, जामनगर जेलमागे, जामनेर, गुजरात) या दोघांना पकडण्यात आले.
त्यांच्याकडून २ लाख ९० हजार रुपये किमतीचा २९ किलो गांजा, ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, दीपक पाटील, विलास पाटील यांनी केली.