मोगलाईत पाईप लाईन टाकण्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:23 IST2020-12-13T21:23:27+5:302020-12-13T21:23:49+5:30
पाणी समस्या सुटण्याची आशा, अनेकांची होती उपस्थिती

मोगलाईत पाईप लाईन टाकण्याचा शुभारंभ
धुळे : शहरातील मोगलाई भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. बऱ्याच ठिकाणी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. जी पाईप लाईन आहे ती खूप जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. ही समस्या लक्षात घेवून पाईप लाईन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ रविवारी सकाळी झाला.
यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेविका किरण कुलेवार, कशिश उदासी, नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, संजय वाल्हे, गुलशन उदासी, गजेंद्र गायकवाड, शिवाजी लंगोटे, अमोल मासुळे, संजय कुलेवार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मोगलाईतील रहिवाशी उपस्थित होते.
मोगलाई भागात पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या भागातील नगरसेवकांचा पाठपुरावा सातत्याने सुरु होता. शिवाय या भागात असलेली पाईप लाईन देखील खूप जुनी झाली होती. परिणामी नागरीकांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नव्हते. ही समस्या लक्षात घेवून ८ इंची, ६ इंची आणि कुठे ४ इंची याप्रमाणे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. प्रभाग ७ मध्ये वेगवेगळ्या सुमारे ६ कोटींच्या कामांची सुरुवात झाली आहे. नागरीकांनी देखील समाधान व्यक्त केले.