पैशांच्या वादातून व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 22:00 IST2021-01-01T22:00:09+5:302021-01-01T22:00:25+5:30
बाजार समिती परिसर : दोघा मद्यपींविरुद्ध गुन्हा

पैशांच्या वादातून व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला
धुळे : आर्थिक वादातून दोन मद्यपींनी व्यापाºयावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती भागात बुधवारी घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित काला असू कुरेशी आणि शकील कुरेशी (रा. कॉटन मार्केट धुळे) यांनी दारूच्या नशेत जलिलपूर, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला रेहान इस्लाम कुरेशी या १९ वर्षीय व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास रेहानने नकार दिला. याचा राग येऊन दोघा संशयितांनी त्याच्यावर चाकूने गळ्यावर, पोटावर, डाव्या हातावर वार झाल्याने रेहान जखमी झाला. जखमी रेहानला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात रेहान इस्लाम कुरेशी याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार काला असू कुरेशी आणि शकील कुरेशी या दोघांविरुद्ध भादंवि कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सैयद करीत आहेत.