शिरपूर : खान्देशच्या मुलीने मिस इंडियाचा किताब मिळवून देशपातळीवर खान्देशचा नावलौकिक केले, हे अभिमानास्पद आहे. तालुक्यातील मुले-मुलीदेखील चांगले शिक्षण घेऊन प्रगती करीत आहेत. पुढच्या भविष्यासाठी अजून तिने तालुक्याचा नावलौकिक करावा, अशी अपेक्षा आमदार काशिराम पावरा यांनी सत्कार कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
गुरुवार संध्याकाळी येथील दादुसिंग कॉलनीतील भाऊसाहेब इंद्रसिंग राजपूत मेमोरियल हॉलमध्ये शिरपूरची मिस इंडिया गजनंदिनी उर्फ गौरी देवेंद्र गिरासे हिचा येथील राजपूत समाजाच्यावतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला़ आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया होते़ यावेळी माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ राऊळ, नितीन गिरासे, सेनेचे राजू टेलर, नगरसेवक चंदनसिंग राजपूज, नगरसेवक राजू गिरासे, नगरसेवक भुरा राजपूत, नगरसेवक हर्षल राजपूत, नवलसिंग गिरासे, माजी सरपंच एकनाथ जमादार, पं.स.चे माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत, जितू गिरासे, कल्याणसिंग राजपूत, डॉ़ श्याम राजपूत, जयपालसिंग गिरासे, राज सिसोदिया, शैलेश गिरासे तसेच राजपूत समाजबांधव उपस्थित होते़
मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया म्हणाले, पिंप्रीसारख्या लहान गावातील व्यक्ती उल्हासनगर येथे कामासाठी गेले तेथून गजनंदिनी हिने उंच शिखर गाठले आहे. खान्देश, राज्य आणि देशाचा हा बहुमान आहे.
मिस इंडिया विजेती गजनंदिनी उर्फ गौरी देवेंद्र गिरासे म्हणाली, २१ व्या शतकात मुली आता विविध क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आघाडी घेत आहेत. मुलींना चांगल्या कामासाठी कुटुंबाने सहकार्य करणे गरजेचे आहे. मिस इंडियाचा बहुमान मिळविण्यासाठी तिने तरुणींना टिप्स दिल्या.
या कार्यक्रमात राजपूत समाजातील सरपंच-उपसरपंचपदी निवड झालेले सावळदेचे सचिन राजपूत, बोरगांवचे योगेंद्रसिंग सिसोदिया यांचा देखील गौरव करण्यात आला़
सूत्रसंचालन सीमा जाधव तर आभार प्रदर्शन योगेंद्रसिंग गिरासे यांनी केले़