कोरोनामुळे यंदा खंडेराव यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:56+5:302021-02-14T04:33:56+5:30
२७ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव असून मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील विविध भागातील ...

कोरोनामुळे यंदा खंडेराव यात्रोत्सव रद्द
२७ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव असून मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील विविध भागातील यात्रा, जत्रा, उत्सव, आनंदमेळावा यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे़
खान्देशातील खंडोबाची एक महत्त्वाची यात्रा म्हणून शिरपूर यात्रा आहे. अरुणावती नदीच्या काठावर व नदीपात्रात ही यात्रा दोन आठवडे भरते़ यात्रोत्सवात सर्वात मोठी उलाढाल मेवाशी मेळाव्यात होत असते़ या काळात मार्केट कमिटी सुमारे ३ कोटींच्यावर उलाढाल करते़ या यात्रोत्सवात राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून घोडे, बैल, म्हैशी विक्रीसाठी येतात़
मेवाशी मेळावा मार्केट कमिटीच्या आवारात भरत असतो़ या ठिकाणी चारा मुबलक मिळत असल्यामुळे तब्बल महिनाभर हा मेवाशी मेळावा भरत असतो़ या यात्रोत्सवात खर्दे बु़ व शिंगावे येथील ग्रामस्थ यात्रेनिमित्त तगतराव सजवून आणून अनेक वर्षापासून ही परंपरा त्यांनी जोपासली आहे़ खंडेराव बाबा भक्त मंडळाने लोकांच्या सहभागातून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. मंदिराचे भव्य आकर्षक रूप यात्रेकरूंना नेहमीच आकर्षित करीत आहे. याचबरोबर हा परिसरदेखील प्रेक्षणीय ठरावा म्हणून विकास कामे झाली आहेत.
अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या धार्मिक कार्यातून या मंदिराची स्थापना झाली असावी असे सांगितले जाते. नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानले जातात. येथील कालू बाबा खंडेरावांची निस्सीम सेवा पूजाअर्चा करूनही मूलबाळ नव्हते म्हणून व्यथित होते. खंडेरावाला स्वतचे शिर अर्पण करण्याचा नवस त्यांनी करून मूल होण्याचे साकडे घातले. त्यांनी शिर अर्पण केल्यावर रक्त न निघता भंडारा निघाला अशी आख्यायिका आहे. नवस करून, देवाला साकडे घालून आपली मनोकामना पूर्तीसाठी यात्रेच्या काळात मान-मानता, नवस करणारे अनेक नवदाम्पत्य व भाविक येत असतात.
यात्रेत दुकान थाटणारे व्यापारी यात्रोत्सव आहे की नाही, याची विचारणादेखील मंदिर संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड यांच्याकडे करीत होते़ मात्र प्रशासनाने नकार दिल्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे़