केबीसी लॉटरी लागल्याचे सांगून शेतकऱ्यास १५ लाखांत गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:34 IST2021-01-09T22:33:36+5:302021-01-09T22:34:01+5:30
सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

केबीसी लॉटरी लागल्याचे सांगून शेतकऱ्यास १५ लाखांत गंडविले
धुळे : केबीसी कंपनीची लॉटरी लागली आहे, असे सांगून शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी गावातील गिरासे दाम्पत्याला तब्बल १५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अमरसिंग भगवानसिंग गिरासे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने व्हॉटसअप कॉलिंग करुन तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागलेली आहे. असे सांगून वेळोवेळी बँकेत सुमारे १५ लाख २६ हजार १०० रुपयांचा गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नववषार्ला प्रारंभ झालेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात व्यक्तीने व्हॉटसअप करुन २५ लाख रुपयांची केबीसी लॉटरी लागली आहे असे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या रकमा भरण्यास भाग पाडले. आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे भरणे बंद करुन पोलीस ठाणे गाठले. पण, हा आर्थिक व आॅनलाईन फसवणुकीचा गुन्हा असल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात गिरासे यांना पाठविण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अॅक्ट ६६ (डी) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.