सुनील बैसाणे
धुळे : जिल्ह्यासह राज्यभरात बायोडिझेलची विनापरवाना विक्री तसेच बनावट बायोडिझेल विक्रीच्या तक्रारी वाढल्या असून, याबाबत शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. तेल कंपन्यांसह प्रशासनाची संयुक्त पथके तयार करून तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्याची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात चारही तालुक्यात प्रत्येकी एक अशा चार पथके सोमवारी तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली. वाहनात बायोडिझेल आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सह सचिव सुधीर तुंगार यांनी १८ ऑगस्टच्या पत्रान्वये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची यंत्रणा व तेल कंपन्यांचे भेसळविरोधी पथक यांच्या संयुक्त पथकाद्वारे तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. तपासणी दरम्यान बायोडिझेल विक्रेत्यांकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, बिगरशेती परवानगी असल्याची खात्री करावी. तसेच बिगरशेती वापराबाबतच्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास त्यानुसार विक्रेत्यांविरुध्द कारवाई करावी अथवा तेल कंपन्यांकडून अवैध ज्या धर्तीवर कारवाई करण्यात येते, त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश आहेत. ही तपासणी मोहीम ३१ ॲागस्टपर्यंत राबवून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश आहेत. तसेच बायोडिझेल अथवा बनावट बायोडिझेलची अवैध विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याच्याही सूचना आहेत. बायोडिझेलचे अवैधरित्या उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना केंद्र तसेच राज्य शासनाने दिल्या आहेत.
तहसील कार्यालय स्तरावर पथके
जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालय स्तरावर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार केली आहेत. धुळे तालुक्यात धुळे शहर आणि धुळे ग्रामीण तहसील कार्यक्षेत्रात पुरवठा निरीक्षक एक व दोन, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन टेरीटोरी मनमाडचे विक्री अधिकारी यांचे पथक आहे. साक्री तालुक्यात साक्री आणि पिंपळनेर तहसील कार्यालय क्षेत्रात दोन पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि इंडियन ऑईल काॅर्पोरेशन औरंगाबादचे विक्री अधिकारी यांचे पथक आहे. शिरपूर तालुक्यात पुरवठा निरीक्षक आणि भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन टेरीटोरी मनमाडचे विक्री अधिकारी यांचे पथक आहे. शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा आणि दोंडाईचा तहसील कार्यक्षेत्रात पुरवठा निरीक्षण अधिकारी शिंदखेडा, पुरवठा अव्वल कारकून शिंदखेडा आणि भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन टेरीटोरी मनमाडचे विक्री अधिकारी यांचे पथक आहे.
धुळे जिल्ह्यात सर्रासपणे विक्री
बायोडिझेल तसेच बनावट बायोडिझेलची अवैध विक्री जिल्ह्यात सर्रापणे सुरू आहे. धुळे तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका पेट्रोल पंपावर तर शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात अन्य एका पंपावर कारवाई झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बायोडिझेलची सर्रासपणे विक्री होत असल्याचे समाेर आले आहे.
काय आहे बायोडिझेल प्रकरण
नियमित डिझेल आणि बायोडिझेल यांच्या दरात मोठा फरक आहे. बायोडिझेल स्वस्त मिळते. त्यामुळे त्याची अवैध विक्री सुरू आहे. त्यातून शासनाचा महसूल तर बुडतोच शिवाय प्रदूषण होऊन पर्यावरणाचादेखील ऱ्हास होतो. वाहनांनादेखील धोका असतो. मुळात नियमित डिझेलमध्ये बायोडिझेल बी-१०० अशी भेसळ करून विक्रीला परवानगी आहे. परंतु भेसळ न करता थेट बायोडिझेल विकले जात आहे. तसेच विविध प्रकारच्या घातक रसायनांपासून देखील बनावट बायोडिझेलचे उत्पादन आणि अवैध विक्री सुरू आहे.