जयंत पाटील यांचा पहिला चहा......!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:54+5:302021-02-14T04:33:54+5:30
धुळे ग्रामीण बैठकीतील गोंधळ - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला वाद व गोंधळ यावर पक्ष अंतर्गत ...

जयंत पाटील यांचा पहिला चहा......!
धुळे ग्रामीण बैठकीतील गोंधळ - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला वाद व गोंधळ यावर पक्ष अंतर्गत बाब असे सांगत त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या भाषणात पक्ष बांधणी आणि पक्षनिष्ठेवर भर देत आता यापुढे अशा गोष्टींना पक्षात फारसे महत्त्व दिले जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
साक्री विधानसभा - साक्री येथील बैठकीत आगामी साक्री नगरपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रित करीत त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सरळ प्रश्न विचारले. त्यात विचारलेली माहिती सांगता आली नाही म्हणून त्यांना धारेवर धरले तसेच त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. यामुळेच साक्रीत पक्षाचे उमेदवार निवडून येत नाही,असे सांगत यापुढे असे चालणार नाही, असा इशाराच त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला.
निजामपूरचा चहा - साक्रीकडून नंदुरबारला जाताना रस्त्यात माळमाथ्यावर निजामपूर येथे अचानक थांबून बस स्थानकावरील टपरीवर जयंत पाटील यांनी चहा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला. येथील चहा हा खूपच चर्चेचा ठरला.
शिंदखेडा - शिंदखेडा येथील कार्यक्रमात जयंत पाटील हे गोटे - बेडसे यांच्या वादावर काही बोलतील, असे वाटत होते. परंतु त्यांनी त्यावर न बोलता शेतकऱ्यांच्या व तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा सिंचनाच्या विषयावर भर दिला. कोणालाही साॉफ्ट काॅर्नर न देता पक्षाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले.
शिरपूर तालुका - शिरपूर तालुक्यात प्रदेशाध्यक्ष मुक्कामी होते. त्यांनी लाॅन्समध्ये मुक्काम केला. रात्री याठिकाणी बंद खोलीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा झाली. बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षाची बांधणीवर जोर देण्याचे सांगितले. तसेच दोन बुथ कमिटीपासून सर्वच नियुक्त्या झाल्याच पाहिजे. आपण दोन महिन्यांनंतर परत दौऱ्यावर येऊ तेव्हा हे काम पूर्ण झालेले पाहिजे. जो काम करेल त्याला संधी मिळेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे समजते.
राष्ट्रवादीचा पहिला चहा - दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत बोलतांना जयंत पाटील यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघ यापूर्वी आपण लढवत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडे जाण्याच्या भानगडीत पडलोच नाही. त्यामुळे आज पहिला चहा राष्ट्रवादीचा घेतला. आम्ही तेव्हा भानावर नव्हतो, पक्ष आहे, पक्षाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याच्याकडे जायला पाहिजे ही आमची चूक आहे, अशी प्रांजळपणे कबुली दिली. तसेच यापुढे जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल, असे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांनी घेतलेला ‘राष्ट्रवादीचा पहिला चहा’ आता कधी दिवस गरम राहिल. की चहाची वाफ हवेत विरून गेल्यानंतर तो पुन्हा थंड होईल, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अजूनही शंकाच आहे.