काँग्रेसच्या मतदारसंघातही जयंत पाटील करणार परिवार संवाद,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:46+5:302021-02-09T04:38:46+5:30
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज्यव्यापी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे. मागील ...

काँग्रेसच्या मतदारसंघातही जयंत पाटील करणार परिवार संवाद,
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज्यव्यापी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे. मागील १३ दिवसांपासून सुरू असलेल्या परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष मजबुतीकरणाचा त्यांचा प्रयत्न आहे. मंगळवारी त्यांची परिवार संवाद यात्रा धुळे जिल्ह्यात पोहोचणार आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघांसोबतच काँग्रेस लढत असलेल्या विधानसभा मतदारसंघातही जयंत पाटील परिवार संवाद करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस सहभागी असताना जयंत पाटील मात्र काँग्रेस व शिवसेनेच्या मतदारसंघातही परिवार संवाद करत असल्याने राजकीय विश्लेषक व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्ह्यात आघाडीतील शिंदखेडा व धुळे शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघातही परिवार संवाद करणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत. धुळे शहर मतदारसंघाचे माजी आ. राजवर्धन कदमबांडे भाजपत गेल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पकड मिळवण्याचे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील याना काँग्रेस पक्षाने कार्याध्यक्ष करीत ताकद दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीणमधील जयंत पाटील यांचा परिवार संवाद लक्षवेधी ठरणार आहे. शिरपूर विधानसभा मतदारसंघात अमरिशभाई पटेल यांनी भाजपत प्रवेश केल्याने तेथील राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील करतील. आगामी काळात राष्ट्रवादीने शिरपूरच्या जागेवर हक्क सांगितला तर नवल वाटायला नको. तर साक्री तालुक्यातही यात्रा जाणार आहे. मित्रपक्षांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातही परिवार संवाद यात्रा जाणार असल्याने पक्षविस्ताराचे राष्ट्रवादीचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत.