जानेवारीत 363 जणांना कोरोना संर्सग, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:32 IST2021-02-01T12:32:47+5:302021-02-01T12:32:54+5:30
धुळे : जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ ...

जानेवारीत 363 जणांना कोरोना संर्सग, तिघांचा मृत्यू
धुळे : जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना या महिन्यात मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी रुग्ण आढळणे सुरूच आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या १०८ रुग्णांवर उपचार सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आहे. २९ जानेवारी रोजी साक्री तालुका कोरोनामुक्त झाला होता. तालुक्यात एकही बाधित रुग्ण नव्हता, मात्र ३० जानेवारी रोजी तालुक्यातील एका व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद फार काळ राहू शकला नाही.
आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८२६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ हजार ३४४ जण बरे झाले आहेत तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील सर्वाधिक १७३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून धुळे तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. तालुक्याचा ४ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर आहे. शिरपूर तालुक्यातील ६७, शिंदखेडा ४५ व साक्री तालुक्यातील ३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
५८ रुग्णांना लक्षणे नाहीत
सध्या उपचार घेत असलेल्या १०८ रुग्णांपैकी ५८ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. २४ रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जणांना मध्यम तर ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १४ व इतर जिल्ह्यात ३ जण उपचार घेत आहेत. तर ७६ जण गृह विलगीकरणात आहेत.
१०८ रुग्णांवर उपचार
१०८ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात धुळे शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील २४ कोरोना बाधित रुग्ण आहेत.
साक्री तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक जण कोरोना बाधित रुग्ण आहे. शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ५ बाधित रुग्ण आहेत. साक्री व शिरपूर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापूर्वीही कमी झाली होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा रुग्ण आढळले होते.