अजबच होती त्यांची प्रेमकहानी फेसबुक मैत्रीचे रूपांतर लग्नात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:24+5:302021-04-06T04:35:24+5:30
शिरपूर तालुक्यातील गरताड येथील आणि सध्या सुरत येथील रहिवाशी सागर पाटील आणि पिंपरी चिंचवड येथील शिवाली मोहने हे दोघे ...

अजबच होती त्यांची प्रेमकहानी फेसबुक मैत्रीचे रूपांतर लग्नात
शिरपूर तालुक्यातील गरताड येथील आणि सध्या सुरत येथील रहिवाशी सागर पाटील आणि पिंपरी चिंचवड येथील शिवाली मोहने हे दोघे चार वर्षांपूर्वी फेसबुकवरील फ्रेन्ड रिक्वेस्टवरून दोघांची मैत्री झाली होती. दोघेही एकमेकांच्या पोस्टला लाइक व कमेंट करीत होते. त्यावेळी त्यांच्यात आभासीच मैत्री होती. त्यानंतर, त्यांचे विचार जुळत गेले. मैत्रीत कसे रूपांतर झाले, ते त्यांनाही कळाले नाही. दिवसेंदिवस मैत्री अधिकच गठ्ठ झाली होती.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात पोलीस भरतीसाठी सागर दाखल झाला. भरतीपूर्व मेडिकल सुरू होते. शिवालीचे बीएस्सी नर्सिंग झाले होते. ती जॉबला होती. तरुणांचे मेडिकल करीत असलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये ती होती. या दरम्यान तिने सागरला ओळखले, पण सागरने तिला ओळखले नाही. कारण शिवालीचे छायाचित्र फेसबुकला नव्हतेच. शिवालीने स्वत:हून ओळख करून दिली. तेथून त्यांच्या प्रेमकहानीला सुरुवात झाली. सागर आणि शिवाली यांची प्रेमकहानी विवाहाच्या चौकटीकडे सरकू लागली. त्या दोघांच्याही घरातून प्रथम विरोध झाला होता. दोघांनीही त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घेत, विवाहाची निश्चिती केली आणि चार वर्षांनंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघांचेही शुभमंगल झाले.