पाऊस लांबल्याने खरिपाच्या पिकांना पाटबंधारे विभाग देणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:48+5:302021-07-07T04:44:48+5:30
खरीप हंगामात अन्नधान्ये, चारा, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बागायतदारांनी ...

पाऊस लांबल्याने खरिपाच्या पिकांना पाटबंधारे विभाग देणार पाणी
खरीप हंगामात अन्नधान्ये, चारा, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बागायतदारांनी आपले पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. वट्टे यांनी केले आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी १ जुलै ते १४ ऑक्टोबर या कालावधीकरिता १ जुलैपासून सुरू झालेला खरीप हंगामामध्ये पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे ठरविले आहे.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येणार आहे.
शेत चाऱ्या स्वच्छ करा
बागायतदारांनी आपापल्या शेत चाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरी अथवा नामंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा दहा टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंड आकारणी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.