धुळे : येथील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावला असून चोरासह चोरीला गेलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे़साक्री तालुक्यातील इच्छापूर येथील पोलीस पाटील दादाजी गबा मारनर (२८) हे धुळे शहरात चाळीसगाव चौफुलीवर चारचाकी गाडी दुरूस्त करण्यासाठी आले होते़ यादरम्यान त्यांना गाडीतच झोप लागली़ त्यावेळी त्यांच्या गाडीतून २४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि सहा हजार रुपये रोख अज्ञात चोरट्याने चोरुन नेले़ याप्रकरणी मारनर यांच्या फिर्यादीवरुन २५ जून रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी वसीम ऊर्फ वड्या सलीम रंगरेज (३२, रा़ शब्बीर नगर, शंभर फुटी रोड धुळे) याला ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा कबुल केला़ तसेच चोरीचे दोन्ही मोबाईल आणि सहा हजार रुपयांची रोकड देखील काढून दिली़ विशेष म्हणजे त्याच्याकडे ८० हजार रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल देखील आढळून आली़ सदर मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे याच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार अजिज शेख, प्रेमराज पाटील, सुशिल शेंडे, मुख्तार शहा, नरेंद्र माळी, हेमंत पवार यांनी या गुन्ह्याचा छडा लावला़
दोन दिवसात लावला चोरीचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:21 IST