लक्षणे दिसताच तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:39+5:302021-04-09T04:37:39+5:30
मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी अनेकजण उशिराने रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच ...

लक्षणे दिसताच तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी अनेकजण उशिराने रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. कोरोना विषाणूच्या चाचणीच्या सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत गृह विलगीकरणातच राहावे.
धुळे जिल्ह्यात हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर आणि ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महानगरपालिकेच्या सहकार्याने २४ तास सुरू राहील, असा कोविड कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच शासकीय किंवा खासगी कोविड रुग्णालयात दाखल व्हावे. यामुळे वेळेत उपचार होऊन पुढील धोका टळू शकेल. याशिवाय कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू थांबविता येतील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा, शारीरिक अंतर ठेवावे आणि हात वेळोवेळी साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.