जैन सोशल ग्रुपला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:10 IST2021-03-28T21:10:33+5:302021-03-28T21:10:47+5:30
उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल गाैरव

जैन सोशल ग्रुपला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
धुळे : सन १९६५ साली निस्वार्थ सामाजिक सेवेच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा ‘जेएसजी ग्लोरी अवार्ड’ शनिवारी राजस्थानातील कोटा येथे पार पडला. धुळ्याच्या जैन सोशल ग्रुपला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून कार्याचा गाैरव करण्यात आला.
विश्व बंधुत्वाचे कार्य करत परस्पर प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या आणि अतिविशिष्ठ सेवाकार्यात अग्रेसर असणाऱ्या ग्रुपला दर दोन वर्षात हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
१७ हून अधिक देशांमधल्या, भारतातील १४ हून अधिका राज्यांमधल्या ४०० हून अधिक ग्रुप आणि ७५ हजारहून अधिक सभासद असलेल्या जैन सोशल गृप आंतरराष्ट्रीय फेडरेशनव्दारे यंदा १४० ग्रुपमधून २३६ प्रवेशिकांपैकी धुळे येथील जैन सोशल ग्रुप यांचा ‘बेस्ट गृप, बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, आणि बेस्ट युवा फोरम प्रेसिडेंट’ अशा चार पुरस्कारांसाठी धुळे सेंटरचे अंतिम नामांकन केले गेले. हि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
दोन वर्षाच्या कार्यकाळात जैन सोशल गृप धुळेतर्फे अनेक समाजोपयोगी कार्य करण्यात आले आहेत. कोरोना काळात डाॅक्टर आपल्या दारी उपक्रमातून औषधे, सॅनिटायझर यासह वैद्यकीय सुविधेचे मदतकार्य केले. १०८ पेक्षा अधिक कार्यामध्ये सेवा बजावली आहे. या कार्यांची दखल, जेएसजी आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या पुरस्कार वितरण समितीमार्फत घेतली गेली आणि धुळे सेंटरला ‘बेस्ट ग्रुप’ चा पुरस्कार तसेच तेजस शामसुखा यांना ‘बेस्ट युवा फोरम प्रेसिडेंट’ पुरस्कार गुणवत्तेच्या आधारावर देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जैन सोशल गृप इंटरनॅशनल फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कमलकिशोर संचेती, सेक्रेटरी जनरल बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष राजेंद्र धोका व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, राजस्थान प्रशासकिय सेवेतील उच्च अधिकारी आयएएस आर.डी. मीना, पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष अनिल काला, राजकुमार जैन, कोटा लोकल सेंटरचे अध्यक्ष पंकज सेठी, सचिव अनुराग जैन आदि उपस्थित होते.
जगभरात अस्तित्व असणाऱ्या संस्थेच्या पुरस्कार वितरणात धुळ्याचा समावेश असल्याबद्दल तसेच केलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल जैन सोशल गृप, धुळे चे संस्थापक अध्यक्ष हरीश चोरडिया, अध्यक्ष नीलेश रुणवाल, सचिव वर्धमान सिंगवी तसेच युवा फोरम अध्यक्ष तेजस शामसुखा यांसह संपूर्ण कार्यकारी मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.