महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:06+5:302021-09-08T04:43:06+5:30

मागील वर्षी कोरोना सुरु झाल्यानंतर अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांना नोकरी सोडण्याची वेळ आली. मोठ्या शहरातून बऱ्याच जणांनी आपल्या गावाकडची ...

Inflation has poured oil, household budgets have deteriorated! | महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले!

महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले!

मागील वर्षी कोरोना सुरु झाल्यानंतर अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांना नोकरी सोडण्याची वेळ आली. मोठ्या शहरातून बऱ्याच जणांनी आपल्या गावाकडची वाट धरली. अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र महागाई ही कमी होत नसून वाढताना दिसत आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. आजच्या स्थितीत महिना कसा पास करायचा या विवंचनेत घरातील महिला दिसून येतात. महिन्याला मिळणारे वेतन लागलीच संपून जात असल्याने उदारी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. याकडे वेळीच राज्यासह केंद्र सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

डाळींशिवाय वरण

सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जेवणात वरणभात हा ठरलेला मेनू असतो. पण, तुरीच्या डाळीची किंमत ही १०० रुपयांच्या पुढे गेल्याने रोजच्या जेवणातून वरण हे गायबच झाल्यासारखे असल्याचे म्हणावे लागेल. महागाई ही वाढत असल्यामुळे रोज होणारे वरण आता आठवड्यातून होत आहे.

सिलेंडर हजाराच्या घरात

वाढणाऱ्या महागाईमुळे सिलेंडरच्याही दरात चांगलीच घशघशीत वाढ होत आहे. ४०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या सिलेंडरने सुध्दा आपल्या किंमतीत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. टप्प्या टप्प्याने झालेल्या दरवाढीने आता १ हजार रुपयांपर्यंत मजल मारलेली दिसून येत आहे.

गृहिणी म्हणतात

- विविध बाबींचे दर वाढल्याने बजेट कोलमडून गेले आहे. रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या सर्वांची किंमती वाढलेल्या आहेत. खरेदी करताना नेमक्या कोणत्या वस्तू कमी करायच्या असा प्रश्न पडतो. आर्थिक ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जातो.

मालती पाटील, धुळे

खाद्यतेलाचे भाव सर्वाधिक वाढलेले आहे. असे असलेतरी खायला ते चुकणार कसे हा प्रश्नच आहे. महिन्याला खरेदीचे प्रमाण कमी केले तरी गरजेच्यवेळी वापरासाठी अतिरिक्त खरेदी करावीच लागते. बिना फोडणीची भाजी करण्याची वेळ आता आलेली आहे.

गितांजली देशमाने, धुळे

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च असा

खाद्यतेल : ५०० रुपये

धान्य : १ हजार रुपये

शेंगदाणे : ४०० रुपये

साखर : ३०० रुपये

साबुदाणा : १०० रुपये

चहापूड : १५० रुपये

डाळ : ८०० रुपये

गॅस सिलेंडर : ४०० रुपये

पेट्रोल : ४० रुपये

डिझेल : ३० रुपये

एकूण : सरासरी ३ हजार रुपये

अशी वाढली महागाई

वस्तू : जानेवारीतील दर : सध्याचा दर :

शेंगदाणे तेल : १०५ : १६०

सोयाबीन तेल : ८० : १३०

साखर : ४५ : ५५

साबुदाणे : ३५ : ४५

मसाले : ११० : १४०

चहापूड : ९० : १३०

तुरडाळ : ८० : १२०

मूगडाळ : ७० : ९०

उडीद दाळ : ५५ : ७५

हरभरा डाळ : ४५ : ७०

Web Title: Inflation has poured oil, household budgets have deteriorated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.