सुक्यामेव्यालाही महागाईचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:56+5:302021-08-18T04:42:56+5:30
भूषण चिंचोरे धुळे : फळे, भाजीपालापाठोपाठ सुकामेव्यालाही महागाईचा तडका लागला आहे. बदामाचे भाव मागील तीन महिन्यात किलोमागे तब्बल ४०० ...

सुक्यामेव्यालाही महागाईचा तडका
भूषण चिंचोरे
धुळे : फळे, भाजीपालापाठोपाठ सुकामेव्यालाही महागाईचा तडका लागला आहे. बदामाचे भाव मागील तीन महिन्यात किलोमागे तब्बल ४०० रुपयांनी वाढले आहेत, तर इतर सुकामेवाही महागला आहे.
थंडीच्या दिवसात सुकामेव्याचे भाव वाढतात. यंदा मात्र थंडी येण्यापूर्वीच सुकामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. बदामाचे दर प्रतिकिलो १ हजार रुपये इतके झाले आहेत. काजू, अंजीर व पिस्ताच्या दरातही वाढ झाली आहे. आवक घटल्याने किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काजूचे दर ८०० ते ९०० रुपये प्रतिकिलो इतके आहेत. अंजीर ११०० ते १२००, तर पिस्त्याचे दर १२०० ते १४०० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत.
यामुळे वाढले भाव -
प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिका या देशांतून सुकामेव्याची आयात केली जाते. बदामचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा परिणाम आयातीवर झाला आहे. आयात कमी झाल्याने भाव वाढल्याचे सांगण्यात आले.
थंडी व सणासुदीच्या काळात वाढते मागणी -
थंडी व सणासुदीच्या काळात सुकामेव्याची मागणी वाढते. त्यावेळी दरातही वाढ होते. यंदा मात्र थंडीच्या आधीच भाववाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सुकामेवा आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया -
मागील तीन महिन्यात बदामाचे भाव ४०० रुपयांनी वाढले आहेत. पहिल्यांदाच एवढी भाववाढ झाली आहे. बदामाचे भाव वाढल्याने ग्राहक इतर सुकामेव्याकडे वळले होते. मात्र आता त्यातही वाढ झाली आहे.
- सुभाष कोटेचा, व्यावसायिक
मागील वर्षी अमेरिकेत सुकामेवा उत्पादनात वाढ झाली होती. त्यामुळे भाव गडगडले होते. त्यानंतर पुढच्या हंगामात तेथील शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने उत्पादन घटले आहे. म्हणूनच भाव वाढले आहेत.
- आकाश रेलन, व्यावसायिक
ग्राफसाठी
दर
बदाम
मे - ६००
ऑगस्ट - १०८०
काजू
मे - ७००
ऑगस्ट - ९००
अंजीर
मे - ५५०
ऑगस्ट - १२००
पिस्ता
मे - ८००
ऑगस्ट - १३००