भारत बंदला सर्वव्यापी पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:50 IST2020-12-07T21:49:46+5:302020-12-07T21:50:13+5:30
महाविकास आघाडीचा रास्तारोको, शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांची निदर्शने

dhule
धुळे : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला आणि मंगळवारच्या भारत बंदला सर्वव्यापी पाठिंबा मिळत आहे. महाविकास आघाडीतर्फे महामार्गावर दोन ठिकाणी रास्तारोको आंदोलन होणार आहे तर विविध शेतकरी, कामगार, कर्मचारी संघटनांतर्फे निदर्शने केली जाणार आहेत. समाजवादी पार्टीसह रेशन दुकानदार, हमाल मापाडी, बाजार समितीमधील व्यापारी आणि कर्मचारी यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीतर्फे सकाळी ८ वाजता देवभाने-कापडणे चाैफुलीवर तर ११ वाजता धुळ्यातील पारोळा चाैफुलीवर रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात शांततेने सहभागी होण्याचे आवाहन आमदार कुणाल पाटील, मंजुळा गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष युवराज करनकाळ, धुळे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजित भोसले यांनी केले आहे.
कर्मचारी संघटना
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देखील बंदला पाठिंबा दिला आहे. सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कामगारांचा पाठिंबा असून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन पंतप्रधानांना पाठविले आहे. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चाैधरी, सरचिटणीस दिपक पाटील यांच्या सह्या आहेत. भोजनकाळात निदर्शने केली जाणार आहेत.
रेशन दुकानदार
शेतकऱ्यांच्या भारत बंदला रेशन दुकानदारांनीही पाठींबा दिला आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय संघटनेचे अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष महेश घुगे यांनी दिली. भारत बंद आंदोलनात स्वस्त धान्यदुकानदार सहभागी होणार आहेत.
विविध कामगार संघटना
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून धुळे येथील शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगार संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक सोमवारी सांयकाळी झाली. या बैठकीत भारत बंदमध्ये सहभागी होण्याची रूपरेषा ठरविण्यात आली. अध्यक्षस्थानी एम. जी. धिवरे होते. रास्तारोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय झाला. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, आयोजक हेमंत मदाने, विविध क्षेत्रातील कामगार संघटना प्रतिनिधींसह काॅ. एल.आर. राव, काॅ. एस.यू, तायडे, काॅ. पोपटराव चौधरी, काॅ. वसंत पाटील, काॅ. राजेश कुळकर्णी, काॅ. दीपक सोनवणे, काॅ. प्रशांत वाणी, प्रमोद शिसोदे, ताहिर बेग मिर्झा आदी उपस्थित होते. वीज वर्कर्स फेडरेशन, आयटक, किसान सभा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, सिटू, इंटक, सहारा बांधकाम मजूर, बॅक युनियन आदी संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
सत्यशोधक शेतकरी
सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, श्रीमीक शेतकरी महासंघ या संघटनांतर्फे धुळ्यात निदर्शने केली जातील. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किशोर ढमाले, यशवंत मालचे, सुभाष काकुस्ते, सुरेश मोरे, रतन सोनवणे, हिरामण ठाकरे, नबाबाइ सोनवणे, मंगला मोरे, शांताराम पवार, बाळू साेनवणे, शाना धनगरे, ग्यानाबाइ पिंपळसे, ताराबाइ मोरे, सुनंदाबाइ महाले, झिपा सोनवणे, धुडकू ठाकरे, यशोदाबाइ मोरे, शिवाजी मोरे, जिभाउ मोरे आदींनी केले आहे.
अनिल गोटेंचे आवाहन
मंगळवारच्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे तसेच सर्व विरोधी पक्षांनी देखील या बंदमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे नंदुरबार प्रभारी अनिल गोटे यांनी केले आहे.
कामगार संघटनांच्या बैठकीत बंद यशस्वी करण्याचा निर्धार झाला.
साक्री तालुक्यात मोटारसायकल रॅली
शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सत्यशोधक संघटनांतर्फे साक्री तालुक्यात मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. दहिवेल चौफुली येथून रॅलीला सुरूवात होइल. त्यानंतर पिंपळनेर, सामोडे, कासारे या गावांमध्ये ही रॅली जाइल. तहसिलदारांना निवेदन देवून रॅलीचा समारोप होइल.
उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा पाठिंबा नाही
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होवू नये असे आवाहन उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, शांतुभाई पटेल, आत्माराम भामरे, जिल्हाध्यक्ष भटू अकलाडे, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ राजपूत, तालुकाध्यक्ष पोपटराव कुवर, पिंपळनेर तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे, आदिवासी आघाडी प्रमुख शांताराम गांगुर्डे, भास्कर काकुस्ते, निंबा जाधव, राजाराम साळुंखे, निळकंठ निकम, रमाकांत गांगुर्र्डे, गंगाधर काळे, नाना शेलार, राहुल गवळे, भिकन बिरारीस, देविदास भदाणे, दादा बिरारीस, विठ्ठल बोरसे आदींनी केले आहे.