मानसिक ताण वाढला; आता जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:36+5:302021-05-09T04:37:36+5:30

धुळे : कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक घटकामध्ये मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वत्र नकारात्मक घडामोडी घडत असल्याने आता ...

Increased mental stress; How to live now | मानसिक ताण वाढला; आता जगायचे कसे?

मानसिक ताण वाढला; आता जगायचे कसे?

Next

धुळे : कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक घटकामध्ये मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वत्र नकारात्मक घडामोडी घडत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न जाहीरपणे विचारला जाऊ लागला आहे.

बहुतेक तरुणांसह आणि पुरुषांमध्ये रोजगार गमावल्याचा ताण आहे, महिलांमध्ये आर्थिक काटकसरीने संसार चालविण्यासह मुलाबाळांची काळजी घेण्याचा ताण वाढला आहे तर वृद्धांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. नकारात्मक घडामोडींच्या या काळात शासन, प्रशासन साऱ्यांनाच धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मानसशास्त्र तज्ज्ञ प्रा. वैशाली पाटील यांनी सांगितले की, खरे तर स्वतःवरील श्रद्धा आणि विश्वास मनाची शक्ती वाढवतात. तुम्ही समुद्राच्या लाटा थांबवू शकत नाही. परंतु लाटांवर स्वार कसे व्हायचे हे मात्र शिकू शकतात. वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाइजर, मास्कचा वापर करून नियमांचे पालन करावे. लसीकरण करून सुरक्षित व्हावे यासह हा काळदेखील निघून जाईल आणि आपण नव्या दमाने उभे राहू, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, अशा शब्दात धीर दिला.

पुरुष सर्वाधिक तणावात

पुरुषांवर कुटुंबाची जबाबदारी असते. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेला आहे तर काहींचे उत्पन्न कमी झाले आहे. शिवाय कुणाला कोरोना झाला तर काय होईल या विचाराने पुरुष सर्वाधिक तणावात आहेत.

कोण म्हणतो, पुरुष व्यक्त होत नाहीत?

पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत असे म्हणतात. पुरुष कठोर मनाचे असतात असे नाही तर पुरुषी मानसिकतेमुळे ते तसे भासवित असतात. परंतु कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करणारे पुरुष कमालीच्या तणावाखाली आहेत. सध्या ते कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि समुपदेशकांपुढे व्यक्त होताना दिसत आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.

तरुणांचे प्रश्न वेगळेच

तरुणांचे प्रश्न वेगळेच आहेत. गेल्यावर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर निघालेल्या तरुणांना कोरोनामुळे परत घरात बसावे लागले.

आधीपासून विविध उद्योग, दुकानांमध्ये कामावर असलेले अनेक तरुणदेखील बेरोजगार झाले. या काळात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली.

उद्योजक आणि व्यावसायिकांनीदेखील कुशल मनुष्यबळवगळता अकुशलच्या बाबतीत काैटुंबिक जबाबदारीचा निकष लावल्याने प्राैढांऐवजी तरुणांवर कामगार कपातीची कुऱ्हाड कोसळली.

कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी आहे. तरुणांचा ओढा असलेली क्षेत्रे ठप्प असल्यासारखी आहेत.

रोजगाराअभावी तरुणांमध्ये ताण अधिक वाढला आहे. रोजगार नाही तर लग्नदेखील नाही ही सर्वात मोठी समस्या आहे.

नोकरी गेली, आता काय करू?

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग आणि लाॅकडाऊन, सततची संचारबंदी, आताचे कठोर निर्बंध यामुळे निम्मे उद्योग, दुकाने बंद आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे तर अनेकांना कमी दिवस काम मिळत आहे. ज्यांच्या रोजगार गेला त्यांना अन्यत्र काम मिळणे कोरोनामुळे सध्यातरी कठीण आहे. त्यामुळे नोकरी गेली, आता काय करू असा प्रश्न आहे. दुसरीकडे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय साधून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनाचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे.

लक्षात घ्या मेंदूचे खाद्य तुमचे विचार असतात जसा विचार करतात तसा मेंदू काम करतो. नकारात्मक विचारांनी मेंदूतील सिसोटोनिन, नाॅरएपिनेफ्रीन, डोपामाइन आणि गॅमा यांच्यातला तोल बिघडला की व्यक्ती भयग्रस्त होऊन व्यक्ती कोरोना सोबत लढायला असमर्थ ठरते. म्हणून सर्वप्रथम घाबरू नका, नियमांचे काटेकोर पालन करा. तुमची जगण्याची तीव्र इच्छाशक्तीच तुम्हाला बळ देईल.

प्रा. वैशाली पाटील, मानसशास्त्र तज्ज्ञ

Web Title: Increased mental stress; How to live now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.