आरोग्य विमा कवच व विद्यावेतन वाढवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:26 IST2021-06-03T04:26:01+5:302021-06-03T04:26:01+5:30
धुळे - वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कोरोनाकाळात आंतर्वासिता करीत असलेल्या डॉक्टरांना आरोग्य विमा कवच व विद्यावेतन वाढवून मिळावे अशी ...

आरोग्य विमा कवच व विद्यावेतन वाढवून द्या
धुळे - वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कोरोनाकाळात आंतर्वासिता करीत असलेल्या डॉक्टरांना आरोग्य विमा कवच व विद्यावेतन वाढवून मिळावे अशी मागणी आंतर्वासित डॉक्टरांच्या अस्मी ( असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स ) या संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव व भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोरोनाच्या काळात आंतर्वासित डॉक्टर सेवा देत आहेत. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार भविष्यात अधिक प्रमाणात कामाचा भार वाढू शकतो. मागील वर्षी फक्त कोविड विभागात ड्युटी करावी लागत होती यावेळी मात्र नॉन कोविड सोबतच लसीकरण मोहिमेची जबाबदारी इंटर्न्स डॉक्टर पार पडत आहेत. कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून काम करत असून यामुळे आमच्या आरोग्याला मोठा धोका आहे. तरीही कर्तव्य बजावत आहोत. पण शासनातर्फे मिळणारे ११ हजार रुपये मानधन अतिशय तोकडे असून त्यात वाढ करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
५० हजार रुपये मानधन द्यावे
मागील वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील विद्यार्थ्यांना ३९ हजार रुपये मानधन दिले होते व ३०० रुपये प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आंतरवासीत विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये मासिक मानधन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. जयप्रकाश पुपुलवाड, डॉ.दिनेश ठाकरे, डॉ.ऋतुराज मालानी यांच्या सह्या आहेत.
मृत कोरोना योध्याला आर्थिक मदत करा -
लातूर येथील आंतर्वासितेचे विद्यार्थी डॉ.राहुल पवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी अस्मी संघटनेने केली आहे.