अखाद्य बर्फाची होतोय् सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:53 IST2019-05-21T11:53:23+5:302019-05-21T11:53:46+5:30
दोंडाईचा : अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

dhule
दोंडाईचा : शहरासह ग्रामीण भागात ऊसाचा रस, शरबत, शिंकजी, लस्सी, बर्फाचे गोळे यासह इतर सर्व थंड पेयात बिनधास्तपणे अखाद्य बर्फाचा वापर केला जात आहे. यामुळे घशाचा आजार वाढला आहे. अन्न व औषध प्रशासन खाते मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसते. अखाद्य बर्फ आरोग्यास हानिकारक असल्याचे माहीत असूनही याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
कारखान्यात तयार होणारा हा अखाद्य बर्फ अशुद्ध पाण्यापासून तयार केला जातो. तो हानिकारक असल्याचे माहीत असूनही अन्न औषध प्रशासन अधिकारी कारवाई करताना दिसत नाही. दोंडाईचात अखाद्य बर्फ मोठया प्रमाणात तयार केला जातो. त्यांच्याकडून हा अखाद्य बर्फ लस्सी, ऊसाचा रस, लिंबू शरबत आदी थंड पेय विक्रेत्यांना विकला जातो. तो याचा वापर सर्रास पेयात करतात.
कडक उन्हात आपली तहान भागविण्यासाठी नागरीक या बर्फाचा वापर करण्यात आलेले थंड पेय पितात. या बर्फामुळे घशाचे आजार लागतात. सध्या दोंडाईचा शहरात घशाचे आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करणे आवश्यक असतांना त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.