बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:01 IST2020-01-01T22:01:02+5:302020-01-01T22:01:23+5:30
ढगाळ वातावरण : तुर, हरभरा, गहू काढणीवर नुकसानीचे सावट; तुर शेंगा पडल्या काळ्या...

Dhule
कापडणे : मागील आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे कापडणेसह परिसरातील धनुर, लोणकुटे, धमाणे, देवभाने, सरवड, सोनगीर, तामसवाडी, हेकंळवाडी, न्याहळोद, बिलाडी या परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे व बदलत्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, दादर यासह काढणी व कापणीवर आलेल्या तूर पिकावरही नुकसानकारक वातावरणाचा दुष्परिणाम होत आहे.
यंदा खरीप हंगामात पावसाने पेरणीच्या वेळेस वारंवार दडी मारल्याने सर्वत्र शेतकऱ्यांच्या पेरण्या दुबार व तिबार झालेल्या होत्या. जेमतेम पिके जगवून हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन आदी काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकेही परतीच्या व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतली व शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यातून जेमतेम शेतकरी सावरत नाही तोपर्यंत शेतकºयांच्या रब्बी हंगामातील सर्वत्र शेतीपिकांचे या दूषित व ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे.
कापडणेसह परिसरात आठवडाभरापासून ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील मुख्य समजले जाणारे गहू, हरभरा व भाजीपाला पिकावर खूप मोठा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. कधी थंडी जास्तच वाढते तर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडी गायब होते. अशा या बदलत्या वातावरणामुळे परिसरातील शेतकºयांच्या रब्बी हंगामातील शेतीपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सध्या तापमानाचा पारा हा सहा अंशांवर स्थिरावला असून थंडीचे प्रमाण अधिक असल्याने गहू व हरभºयाला हे वातावरण पोषक आहे. मात्र लगेच बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे.