पोलिसांच्या तक्रारीचा लागलीच निपटारा, ‘समाधान’ हेल्पलाइन तरीही कार्यरतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:38 IST2021-09-26T04:38:49+5:302021-09-26T04:38:49+5:30
धुळे : पोलीस कर्मचारी असो वा अधिकारी यांच्या तक्रारींचा निपटारा लागलीच होण्यासाठी समाधान हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. तक्रारी ...

पोलिसांच्या तक्रारीचा लागलीच निपटारा, ‘समाधान’ हेल्पलाइन तरीही कार्यरतच!
धुळे : पोलीस कर्मचारी असो वा अधिकारी यांच्या तक्रारींचा निपटारा लागलीच होण्यासाठी समाधान हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. तक्रारी येण्यापूर्वीच त्याचे निरसन होत असल्याने वर्षभरात केवळ एकच तक्रार या हेल्पलाइनवर आली आहे. त्याचेही निरसन लागलीच करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी असो की कर्मचारी यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी पोलीस हेल्पलाइन अर्थात समाधान हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा आधार घेऊन कर्मचारी आपल्या प्रशासकीय अडचणी अगदी बिनधास्तपणे मांडू शकतो. त्याची अधिकृत नोंददेखील घेतली जाते. त्याचे निरसन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत तक्रारीचे निराकरण करण्यात येते. वर्षभरात केवळ एकच तक्रार आल्याने ती समजून घेऊन त्याचेही निराकरण लागलीच तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले असल्याचे सांगण्यात आले. याच्यावरून कोणाच्या काहीही तक्रारी नसल्याची बाब अधोरेखित होत आहे.
केवळ एकच तक्रार दाखल
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची काम करण्याची तऱ्हा वेगळीच होती. कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असल्यास त्या अगोदर समजून घेत होते. परिणामी, वर्षभरात मे महिन्यात पदोन्नतीसंदर्भात एकच तक्रार समाधान हेल्पलाइनवर आली. तक्रार दाखल होताच अवघ्या दोन दिवसांत दाखल तक्रारीचा निपटारा करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
रजा आणि वागणुकीचा
बसविला ताळमेळ
- पोलिसांना रजा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; पण धुळे जिल्हा पोलीस दलात मात्र परिस्थिती पाहून रजा दिली जाते.
- पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून हीनदर्जाची वागणूक मिळते, अशी एकही बाब सध्यातरी समोर आलेली नाही.
- बरेच प्रश्न हे संवादातून सुटत असतात. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जिल्ह्यात कुठे जुगलबंदी असल्याचे म्हणता येणार नाही.
प्रश्न मार्गी लावले
तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलीस कर्मचारी असो वा अधिकारी यांचे जे काही खातेअंतर्गत समस्या होत्या त्या जास्तीत जास्त सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, कोणाच्या अडीअडचणी असतील असे काही म्हणता येणार नाही. तरीदेखील कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना निश्चित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक
२०२१ मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी : ००
फेब्रुवारी : ००
मार्च : ००
एप्रिल : ००
मे : ०१
जून : ००
जुलै : ००
ऑगस्ट : ००