ओपन स्पेसवर बेकायदेशीर बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:45 IST2020-01-03T22:45:23+5:302020-01-03T22:45:50+5:30
बोरसे नगरातील प्रकार चव्हाट्यावर : स्थानिक नागरिकांनी मांडली निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे व्यथा

ओपन स्पेसवर बेकायदेशीर बांधकाम
धुळे : गोंदूर रोडवर बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रशासनाच्या ओपन स्पेसमध्ये महिलेने अतिक्रमण करत घराचे पक्के बांधकाम केले आहे़ हा बेकायदेशीर प्रकार स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन चव्हाट्यावर आणला आहे़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे़
गोंदूर रोडवरील बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोरील ओपन स्पेस ही ग्रामपंचायत वलवाडी यांच्या नावांवर आहे़ बोेरसे नगरातील प्लॉट नंबर १३ मध्ये राहणाऱ्या जनाबाई श्रीराम बोरसे यांनी या ओपन स्पेसची जागा त्यांच्या स्वत:च्या मालकीची आहे, असा समज करुन कोणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत पक्के घर बांधलेले आहे़ या जागेवर तिच्या कुटुंबातील मयत सदस्याचे वीर बसवून मंदिराचे पक्के बांधकाम केलेले आहे़ ग्रामपंचायतीच्या अर्थात हद्दवाढीनंतर महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे हे अतिक्रमण आहे़ त्यामुळे आयुक्त अजीज शेख यांनीही तातडीने दखल घेण्याची मागणी केलेली आहे़
दरम्यान, सार्वजनिक गणोत्सव, नवरात्रीचा उत्सव असे कार्यक्रम घेण्याचे ठरविल्यास जनाबाई श्रीराम बोरसे या घेवू देत नाही़ अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात़ त्यांचा मुलगा आणि जावाई हे देखील शिवीगाळ करतात़ धमक्या देत हातपाय तोडण्याची भाषा करतात़ आम्हाला याठिकाणी वृक्ष लागवड करु देत नाही़ या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक विहिरीचा वापर देखील त्या करु देत नाही़