धुळे : शहरातील मोहाडी उपनगर, म्हाडा वसाहतीसह चक्करबर्डी परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव जलशुध्दीकरण केंद्राची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ या ठिकाणचा स्लॅबच कोसळला़ तरीदेखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष कायम आहे़ असे असूनही नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़धुळे तालुक्यातील तिखी रानमळा शिवारात डेडरगाव तलावाची रचना करण्यात आली आहे़ या तलावातून पाणी शुध्दीकरण केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजेची मदत न घेता पूर्ण क्षमतेने पाणी सिमेंट जलकुंभापर्यंत पाणी पोहचते़ त्यासाठी नैसर्गिकरीत्या पूर्ण उतार करण्यात आल्याने पाणी पोहचण्यात कोणताही अडथळा येत नाही़ खर्च लागत नाही़ अंदाजे या योजनेला शंभर वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ तसेच डोंगरामुळे या तलावात नैसर्गिकरीत्या पावसाचे पाणी जमा होत असते़ डेडरगाव तलावातून २५ ते ३० लोकवस्तीला पाणी वितरित केले जाते़ त्यात मोहाडीउपनगर, म्हाडा वसाहत, चक्करबर्डी परिसराचा समावेश होतो़ सर्वात जुनी ही योजना असूनही आजतागायत नियमितपणे पाणी वितरणाचे काम मार्गी लावले जात आहे़ अद्यापपर्यंत अडथळा आलेला नव्हता आणि आजही अडथळा आलेला नाही़ स्लॅब कोसळूनही पाणी वितरित केले जात आहे़गेल्या एक ते दोन महिन्यांपुर्वी डेडरगाव जलशुध्दीकरण केंद्राचा स्लॅब कोसळला़ दुर्दैवाने या दुर्घटनेत कोणलाही कोणत्याही प्रकारची इजा पोहचलेली नाही़ पण, स्लॅब कोसळल्यानंतर त्याची तातडीने डागडुजी तातडीने होणे अपेक्षित होते़ किंबहुना प्रशासकीय पातळीवर धावपळ होऊन गंभीर अशा बाबीकडे पाहणे गरजेचे होते़ परंतु याकडेही उदासीनताच दिसून येत आहे़ इतके दिवस होऊनही डागडुजीचे काम हाती घेण्यात आलेले नाही़ कामाची निविदा काढली असल्याचे प्रशासकीय आणि गुळगुळीत उत्तर देऊन प्रशासन मोकळे झाले आहे़ निविदेची मुदत कधी होईल, ठेकेदार कधी मिळेल, काम कधी सुरू होईल असे विविध प्रश्न आजही अनुत्तरितच आहे़ यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरुन दुरुस्तीसाठी हालचाली होणे अपेक्षित आहे़साथीच्या आजाराचा धोका शक्यसध्या कोरोना या विषाणू संसर्ग आजाराने सर्वत्र थैमान माजविले आहे़ त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे़ आजच्या परिस्थितीत हाच एकमेव विषय सर्वांच्या अजेंड्यावर आहे़ असे असलेतरी पिण्याचे पाणी आणि त्याचा पुरवठा हादेखील महत्त्वाचा विषय आहे, हे विसरुन चालणार नाही़ पण, याच गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याचे समोर येत आहे़ स्लॅब तुटल्यामुळे केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दूषित आणि अशुध्द झाल्यास त्यातून साथीच्या आजाराचा धोका संभवतो़ स्थायी समितीच्या बैठकीत पाण्याचा विषय गाजतो़ पण, स्लॅब कोसळला हा विषय चर्चेतदेखील येत नाही, याचे आश्चर्य आहे़डेडरगाव तलाव जलशुध्दीकरण केंद्राचा स्लॅब कोसळला असल्याने त्याची पाहणी करण्यात येईल़ लवकरात लवकर त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल़ - कैलास शिंदे, अभियंता
स्लॅब कोसळूनही दुर्लक्ष कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:21 IST