एक लाखावर उत्पन्न असल्यास मिळणार पांढरे रेशन कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST2021-02-05T08:43:37+5:302021-02-05T08:43:37+5:30
धुळे - ज्यांचे उत्पन्न एक लाखांवर असेल त्यांचे जुने रेशनकार्ड रद्द होऊन त्यांना पांढरे रेशनकार्ड मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ...

एक लाखावर उत्पन्न असल्यास मिळणार पांढरे रेशन कार्ड
धुळे - ज्यांचे उत्पन्न एक लाखांवर असेल त्यांचे जुने रेशनकार्ड रद्द होऊन त्यांना पांढरे रेशनकार्ड मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली असून अपात्र कार्डधारकांची शोधमोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ४० हजार ६०७ लाभार्थी आहेत. त्यात, अंत्योदय वर्गातील ७६ हजार ९७६ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब वर्गात २ लाख १६ हजार २९५ व १ लाख २९ हजार ८५९ केशरी कार्डधारक लाभार्थी आहेत. अपात्र कार्डधारक शोधण्यासाठी प्रशासन शोधमोहीम हाती घेणार आहे. शोधमोहिमेच्या माध्यमातून कागदपत्रांची तपासणी करून किती रेशनकार्ड पात्र व किती रेशनकार्ड अपात्र ते ठरवले जाणार आहे. रेशनकार्डधारकांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. तपासणीत आढळलेल्या बोगस लाभार्थ्याला अपात्र ठरवले जाणार आहे. १ फेब्रुवारीपासून शोधमोहीम सुरू होणार होती. मात्र जिल्ह्यात शोधमोहिमेने अजून गती घेतलेली नाही. सध्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डधारकांच्या खात्यांची केवायसी करण्याचे काम सुरू आहे. तसेच ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत ज्यांनी रेशन घेतलेले नाही त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही पुरवठा विभागाने सुरू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती -
शिधापत्रिकांच्या तपासणीसाठी शोधमोहिमेस सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये, पोलीस अधीक्षक, महानगर पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश आहे.
तर रेशनकार्ड रद्द -
शोधमोहिमेत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांचा रहिवासाचा पुरावा तपासला जाणार आहे. लाभधारक दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्यास रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास त्यांना पांढरे रेशनकार्ड मिळणार आहे.
हे पुरावे आवश्यक -
शोधमोहिमेत कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. लाभार्थाच्या एक वर्षाच्या आतील रहिवासाचा पुरावा आवश्यक आहे. मतदान यादीत नाव असावे. तपासणीवेळी लाभार्थ्यांकडून हमीपत्र भरण्यात येणार आहे.
या कारणाने रेशनकार्ड रद्द होईल -
बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी प्रशासनाने शोधमोहिमेची योजना आखली आहे. शोधमोहिमेत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर त्याचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत रेशन न घेणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत रेशन न घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रतिक्रिया -
सध्या केवायसी व ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत रेशन न घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात लवकरच बोगस रेशनकार्ड धारकांची शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. बोगस लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येतील. यामुळे पारदर्शकता निर्माण होईल. तसेच पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल. लाभार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेणार आहोत.
- रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी
एकूण रेशनकार्ड धारक - ४,४०,६०७
अंत्योदय - ७६,९७६
केशरी - १,२९,८५९
प्राधान्य यादी - २,१६,२९५