जेवणाच्या बिलावरुन हाॅटेलचालकावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:52 IST2021-04-05T22:51:52+5:302021-04-05T22:52:53+5:30
शिंदखेडा बसस्थानकासमोरील घटना, चार जणांविरुद्ध गुन्हा

जेवणाच्या बिलावरुन हाॅटेलचालकावर कोयत्याने हल्ला
धुळे : शिंदखेडा बसस्थानकासमोरील हॉटेलात जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरुन चौघांनी धिंगाणा घातला. हाॅटेल चालकावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यांच्या भावालाही मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
चेतन गोरख देशमुख (२६, रा. एकविरा कॉलनी, शिंदखेडा) याचे शहरातील बसस्थानकासमोर कृष्णा कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर चेतन नामक हाॅटेल आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हाॅटेलात जेवणासाठी आलेल्या चौघांकडे जेवण आटोपल्यानंतर बिल मागितले. त्याचा राग येऊन गोल्या ऊर्फ यशराज दीपक अहिरे (रा. स्टेशनरोड, शिंदखेडा) याने कोयत्याने चेतन याच्या डोक्यावर मागील बाजूस वार केले. तर अल्केश सुरेश माळी (रा. जनता नगर, शिंदखेडा), दीपक प्रताप अहिरे व कृष्णराज दीपक अहिरे (रा.स्टेशन रोड, शिंदखेडा) या तिघांनी हॉकी स्टीक, बेसबॉलची बॅटसह काठीने चेतन याच्यासह त्याच्या भावाला बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दीपक अहिरे याने चेतन याच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी काढून नेली. यावेळेस काहीकाळ हाॅटेलसह परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावरुन चौघांविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर घटनेचा तपास करीत आहेत.