कापडणे येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा शेतकरी प्रकाश सीताराम पाटील यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस ३ एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली. पाणी मुबलक असल्याने टरबुजाचे अतिशय उत्कृष्ट व विक्रमी उत्पादन मिळाले .एका फळाचे वजन आठ ते नऊ किलोपर्यंत होते .मात्र गेल्या महिन्याभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने उत्पादित टरबूज पिकाला मोठ्या व्यापाऱ्यांकडून मागणी होत नसल्याने त्याचा कमालीचा आर्थिक फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे .
प्रकाश पाटील यांना दिल्ली येथील मार्केटमध्ये १५-२० रुपये किलोदराने टरबूज विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. गेल्या आठवड्यात त्यांनी २१ टन टरबूज दिल्लीला पोहोचते केले. सुरुवातीला १५ ते २० रुपये किलो टरबुजाची विक्री झाली, नंतर मागणी घटली. बरेच टरबूज मार्केटमध्ये सोडून दयावे लागले. दिल्लीत १ लाख ६४ हजार रुपयांच्या टरबुजाची विक्री झाली. यातून व्यापाऱ्याने ट्रकचे भाडे १ लाख १६ हजार ट्रक मालकाला दिले. उर्वरित ४८ हजार रुपये शेतकरी प्रकाश पाटील यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र दिल्लीच्या व्यापाऱ्याने ते देखील दिले नाहीत.
चौकट-
शेती करण्याची मला फार आवड आहे. दरवर्षी मी आगळीवेगळी शेती नवीन तंत्राचा वापर करून प्रत्येक फळपीक लागवड करतो. अनेक वेळेस टरबूज पिकांची शेती यशस्वी केली आहे. यावर्षीदेखील ५० ते ६० टन टरबूज उत्पादन काढले. मात्र गावोगावी टरबूज विकूनही परवडत नाही. दिल्ली मार्केटला टरबूज विकून ४८ हजार शिल्लक राहिले. ते शिल्लक पैसेदेखील दिल्लीचा व्यापारी देत नाही, असे शेतकरी प्रकाश पाटील यांनी सांगितले.