हिरेत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:32+5:302021-02-07T04:33:32+5:30
धुळे : जिल्ह्याचे कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाबाधित ...

हिरेत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
धुळे : जिल्ह्याचे कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येत होते. त्यात गंभीर व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा समावेश अधिक होता. जिल्ह्यातील ३९१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३०५ बाधित रुग्ण हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दगावले आहेत. मृत्यूनंतर कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ९ इतकी आहे, तर इतर खाजगी रुग्णालयात ७७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिरे महाविद्यालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या इतर रुग्णालयांपेक्षा सर्वाधिक आहे. ० ते १२ या वयोगटातील एकाही कोरोनाबाधित बालकाचा मृत्यू झालेला नाही. ६० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचे जास्त मृत्यू झाले आहेत. ६० पेक्षा अधिक वय असलेल्या २०० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २१ ते ३० या वयोगटातील १५, ३१ ते ४० वयोगटातील १८, ४१ ते ५० वयोगटातील ४९, तर ५१ ते ६० या वयोगटातील १०६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच मृत्यूची संख्याही घटली आहे. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मृत्यूसंख्या अधिक होती. ऑक्टोबर महिन्यानंतर आढळणाऱ्या बाधित रुग्णांचे, तसेच मृत्यूचे प्रमाण कमी झाले. मृतांमध्ये २८४ पुरुष, तर १०६ महिलांचा समावेश आहे. महिला व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी राहिले आहे.
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू-
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्वाधिक बाधितांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल १५० बाधितांचा मृत्यू झाला होता. या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः कहरच सुरू होता. दररोज किमान ५ ते ६ बाधितांचा मृत्यू होत होता, तसेच रुग्ण आढळण्याचे प्रमाणही जास्त होते. जुलै महिन्यात ५१, तर सप्टेंबर महिन्यात १०१ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
धुळे शहरात सर्वाधिक मृत्यूनोंद
धुळे शहरात १७४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर धुळे तालुक्यातील ७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शिरपूर तालुक्यातील ६७, शिंदखेडा तालुक्यातील ४५ व साक्री तालुक्यातील ३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्याचा मृत्यूदर सर्वांत जास्त आहे. धुळे तालुक्यात आढळलेल्या रुग्णांपैकी ४ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.