चोरी आणि घरफोडीच्या घटना वर्षभरात कमी झाल्या नाहीत तर वाढल्याच आहेत. चोरीच्या घटनांसोबतच चोरट्यांनी दुचाकीसुध्दा लंपास केल्या आहेत. ही घटना लक्षात आल्यानंतर त्याचा सुरुवातीला शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. शेवटी दुचाकी सापडली नाही तर त्याची फिर्याद समोरच्या व्यक्तीने वारंवार तगादा लावल्यानंतर नोंदवून घेतली जाते. त्यानंतर अन्य घटनांप्रमाणे या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरु केला जातो. विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांचा मुसक्या आवळल्या आहेत, हे नाकारुन चालणार नाही. एकाचवेळेस एकापेक्षा अधिक दुचाकी त्यांच्या चौकशीतून हस्तगत केलेल्या आहेत. ही स्थिती दुचाकीची असताना मात्र त्या तुलनेत सायकल चोरीच्या घटनांकडे फारसे लक्ष दिले जात नाही, अशी ओरड बहुसंख्य सर्वसामान्य नागरिकांची आहे. तसा अनुभवदेखील बऱ्याचजणांना आलेला आहे.
पार्टसची हेराफेरी
चोरट्यांकडून सायकल असो वा दुचाकी चोरल्यानंतर दुचाकीचे पार्टस् काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा अंदाज आहे. जुन्या गाड्यांपेक्षा भंगारात विकलेल्या साहित्याला अधिक किंमत मिळत असल्याचे म्हटले जाते. बहुधा त्याचाच आधार चोरट्यांकडून घेतला जात असावा, असा कयास आहे. सायकल चोरल्यानंतर दुचाकीप्रमाणे त्याच्याही पार्टसची हेराफेरी केली जात असावी, असा अंदाज आहे़
दाखल करण्यास टाळाटाळ
दुचाकी चोरीला गेल्यानंतर लागलीच काही गुन्हा नोंदवून घेतला जात नाही. सुरुवातीला त्याचा तपास आणि शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल होताच दुचाकी सापडते, असेही काही होत नाही. तीच स्थिती सायकल चोरीचीसुध्दा आहे. आजही सर्वसामान्य लोकांचा वावर हा सायकलीवरच असताना तीच सायकल चोरीला गेल्यानंतर त्यांच्यापुढे बिकट प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पोलिसांकडून अपेक्षित प्रमाणात दुचाकींचा शोध लागत नसताना सायकलींचा कुठे लागेल? हादेखील आता चर्चेचा विषय ठरलेला आहे.
(कोटसाठी)
दुचाकीप्रमाणे सायकल चोरीला गेली असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. त्याचाही शोध लावण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
आकडेवारी
दुचाकी चोरी : २४२
तपास झाला : ६२
सायकल चोरी : ००
लागलेला तपास : ००