टॅँकरने पाणी पुरवून पिंपरी गावाला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:49 IST2019-06-09T14:48:36+5:302019-06-09T14:49:08+5:30

संडे अँकर । डॉ.अभय कुलकर्णी यांचे औदार्य; एक-दोन दिवसाआड १७ हजार लिटर्स पाणी होते वितरित

Helping Pimpri village by providing water to the tanker | टॅँकरने पाणी पुरवून पिंपरी गावाला मदतीचा हात

dhule

सुरेश विसपुते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा जिल्ह्यातील विविध गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींची मदत होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. हद्दवाढीत शहरात आलेल्या पिंपरी येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन येथील प्रथितयश बालरोगतज्ञ डॉ.अभय कुलकणी व भाग्यश्री कुलकर्णी यांच्यातर्फे आठवड्यातून दोन वेळा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वी पिंपरी हे गाव शहर हद्दीत नव्हते. हे गाव आदिवासी समाज बहुल आहे. तेथे कोणत्याही स्वरूपाची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.अभय व भाग्यश्री कुलकर्णी हे दाम्पत्य दरवर्षी एक-दोन दिवसाआड टॅँकरद्वारे सुमारे १७ हजार लिटर पाणी वाटपाची व्यवस्था करतात. या कामात त्यांचे सहकारी धनंजय देवरे, राजू देवरे, किरण पाटील, जगन्नाथ नेरकर आदींचा सहभाग असतो.
हा उपक्रम दरवर्षी तेथील ग्रामस्थांना टंचाई जाणवू लागताच सुरू करण्यात येतो, असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून हे गाव पाणीटंचाईला सामोरे जात आहे. गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
या संदर्भात गावाचे माजी सरपंच शालीक ठाकरे यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले की, आमच्या गावात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत डॉ.अभय कुलकर्णी व त्यांचे सहकारी गावासाठी पाण्याचा टॅँकर पाठवितात. त्यामुळे टंचाईची समस्या दूर होते, पाण्यासाठी उन्हात होणारी भटकंती टळते, असे सांगून त्यांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. अशा परिस्थितीत समाजातील इतरांनीही बांधिलकीची भूमिका घेऊन अन्य गावांची मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
दिलासा
गावाला कायमस्वरूपी पाण्याची टंचाई जाणवते. दुसरीकडे कुठेही पाण्याची सोय होत नाही. धुळे शहर हद्दीत गाव समाविष्ट झाल्यानंतरही या गावाच्या पाणीटंचाईकडे लक्ष पुरविण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत डॉ.कुलकर्णी यांच्या पुढाकारामुळे पिंंपरीकरांना चांगलाच दिलासा मिळाल्याचा प्रत्यय तेथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रियांद्वारे येतो. भरउन्हाळ्यात डॉ.कुलकर्णी यांनी माणुसकीसह सामाजिक बांधिलकी मानून टॅँकरद्वारे पुरविलेल्या पाण्याची सध्या मोठी मदत होते, असे पिंपरी येथील ग्रामस्थ बन्सी ठाकरे, प्रवीण ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे व दौलत ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Helping Pimpri village by providing water to the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे