सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:56+5:302021-06-03T04:25:56+5:30
धुळे : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात नेर, ...

सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस
धुळे : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात तारांबळ उडाली.
जिल्ह्यात नेर, निजामपूर, न्याहळोद, नगाव, सोनगिर, शिंदखेडा, वर्षी, बिलाडी, तिसगाव ढंडाने, थाळनेर या गावांसह चारही तालुक्यातील इतर गावांच्या शिवारात वादळी पावसाने बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर जोरदार हजेरी लावली. काही भागात अर्धा तास, तर काही गावांमध्ये तासभर पाऊस पडला. निजामपूर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस पहिल्यांदाच झाला.
धुळे शहर आणि परिसरात अर्धा तास मुसळधार बरसल्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. कार्यालये बंद होण्याच्या वेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता पाऊस सुरू झाल्याबरोबर नेहमीप्रमाणे अनेक भांगामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. विजेची ये-जा सुरुच होती. साक्री रोड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने तरुणांनी अतिशय संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शंभर टक्के वीज वसुली असूनदेखील वीज पुरवठा सुरळीत नसतो, अशी खंत व्यक्त होत आहे.
सांजोरी, ता. धुळे शिवारात गेल्या रविवारी आणि सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शशिकांत जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील शेडनेट हाऊसचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तलाठी यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षीच त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन शेडनेट उभारले होते. डोक्यावर कर्ज असतानाच शेडनेट उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी होत आहे.