तिसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:21+5:302021-06-20T04:24:21+5:30
तिसरी लाट येईल का? कधीपर्यंत येऊ शकते? उत्तर - कोरोनाची तिसरी लाट येईलच असे खात्रीशीरपणे सांगता येणे शक्य ...

तिसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे
तिसरी लाट येईल का? कधीपर्यंत येऊ शकते?
उत्तर - कोरोनाची तिसरी लाट येईलच असे खात्रीशीरपणे सांगता येणे शक्य नाही. राज्याच्या टास्क फोर्सनेदेखील त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट आली तर आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अचानक रुग्णांची वाढ झाली होती. आता दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णांची संख्या पुन्हा वाढली तरी ग्रामीण भागातील रुग्णांना त्याठिकाणीच उपचार मिळावे, शहरातील रुग्णालयावर ताण येऊ नये यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. तसेच तिसरी लाट आली नाही तरी निर्माण होत असलेल्या आरोग्य सुविधांमुळे भविष्यात फायदाच होणार आहे.
प्रश्न - तिसऱ्या लाटेत लहान बालकांमधील संसर्गाचे प्रमाण वाढेल का?
उत्तर - पहिल्या लाटेत लहान बालकांमधील संसर्गाचे प्रमाण ३.५० टक्के इतके होते. दुसऱ्या लाटेतही तेवढेच प्रमाण होते. मात्र एकूण बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने संसर्ग झालेल्या बालकांची संख्या जास्त वाटत होती. तिसरी लाट आली तरी लहान मुलांनाच संसर्ग अधिक राहील, असे कोणतेही संकेत नाहीत. मात्र लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोविडचे प्रकार वेगवेगळे असतात. नवजात बालक, १ ते १२ वयोगट व १२ ते १८ वर्षातील मुलांमध्ये कोरोनाचे वेगवेगळी लक्षणे दिसतात. तसेच ते सुपर स्प्रेडरही ठरू शकतात.
प्रश्न - तिसऱ्या लाटेबाबत काय तयारी केली आहे?
उत्तर - तिसऱ्या लाटेबाबत बेसावध न राहता तयारी सुरू केली आहे. नवजात बालकांसाठीचा आयसीयू (एनआयसीयू) व पीडियाट्रिक आयसीयू तयार करण्यात आला आहे. तसेच आयसीयूत लहान बालकांना कसे हाताळावे व त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत महापालिका व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ऑक्सिजन टँक व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत.
प्रश्न - लहान बालकांच्या लसीकरणाला कधी सुरुवात होईल ?
लहान बालकांच्या लसीकरणाबाबत सध्या ट्रायल सुरू आहेत. त्यामुळे लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर दुर्लक्ष न करता तत्काळ त्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत सजग करावे. स्वच्छतेचे संस्कार त्यांच्यावर करावे. त्यामुळे कोरोनापासून बचाव तर होईलच पण टीबी व इतर संसर्गजन्य आजारही होणार नाहीत.
तीन ऑक्सिजन प्रकल्प -
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या तीन प्रकल्पांचे काम प्रगती पथावर आहे. ६०, १०० व १७० जंबो सिलिंडर प्रति दिवस अशी त्यांची क्षमता आहे.
ऑक्सिजन टँक प्रक्रियेला सुरुवात -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित आहे. तसेच २० हजार लिटर क्षमतेचा आणखी दुसरा टँक उभारण्यात आला आहे. त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दोन डोस घेतले तर म्युकरचा धोका नाही -
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर म्युकरमायकोसिस होत नसल्याचे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण महत्त्वाचे आहे.