परीक्षार्थींचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉलतिकीट एकाचे पत्ता दुसऱ्याचाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:16+5:302021-09-25T04:39:16+5:30
धुळे - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट क’ व ‘गट ड’ विभागाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. शनिवार ...

परीक्षार्थींचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉलतिकीट एकाचे पत्ता दुसऱ्याचाच!
धुळे - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट क’ व ‘गट ड’ विभागाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. शनिवार व रविवारी होणाऱ्या परीक्षेचे हॉलतिकीट पाहून अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. काही विद्यार्थ्यांचा पत्ता तर काहींचे फोटोच चुकीचे आले आहेत.
जिल्ह्यातील २९ केंद्रांवर रविवारी सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदांसाठी परीक्षा होत आहे. गट क च्या पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र इतर जिल्ह्यात मिळाले आहे. परीक्षा केंद्र नाशिक येथे मिळावे, यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा अहमदनगर व परभणी जिल्ह्यातील केंद्रांवर आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
हॉलतिकिटावर चुकाच चुका!
हॉलतिकिटावर विद्यार्थ्यांचा पत्ता चुकला आहे. तसेच फोटोही बदलले आहेत. हॉलतिकीट व्हाॅट्सॲप व ई मेलवर पाठविणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ई मेलवर प्राप्त झालेच नाही.
परीक्षार्थी चिंतेत!
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी अर्ज केलेला आहे. अर्ज करताना नाशिक हे परीक्षा केंद्र निवडले होते. मात्र प्रवेशपत्रावर परभणी हे परीक्षा केंद्र आले आहे. परभणी हे लांब असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
-
शनिवारी परीक्षा होत असलेल्या गट ड संवर्गातील पदासाठी अर्ज केला आहे. मात्र हॉलतिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ता अपूर्ण आला आहे. शेवटी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा लागला.
-
चुका आढळल्यास परीक्षार्थ्यांनी काय करावे?
प्रवेशपत्राबाबत अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण केंद्रे - २९
परीक्षार्थी - १०,१०४