आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST2021-02-22T04:24:37+5:302021-02-22T04:24:37+5:30
गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही ...

आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज
गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु आरोग्य कर्मचारीही मनुष्यच आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरच अवलंबून असते. मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावी ही केंद्रेही ‘आजारी’च आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या ॲागस्ट महिन्यात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप रोस्टर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. रिक्त पदांवर पूर्णवेळ कर्मचाऱ्याची निुक्ती झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. विदर्भ, मराठवाडासह मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याने, चिंता वाढलेली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे. मात्र संकट सांगून येत नाही. त्यामुळे आपण संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य देणे नितांत गरजेचे झालेेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनानेही विचार करण्याची गरज आहे.