थाळनेर परिसरात गारांचा पाऊस, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, पंचनामा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:41 IST2021-02-20T05:41:56+5:302021-02-20T05:41:56+5:30
थाळनेर - तालुक्यात थाळनेरसह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीने रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांचे ...

थाळनेर परिसरात गारांचा पाऊस, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, पंचनामा सुरू
थाळनेर - तालुक्यात थाळनेरसह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीने रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानाचा पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका आदी पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती. परंतु, गुरुवारी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील काढणी व मळणीस आलेल्या गहू, हरभरा, दादर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वरूणराजाने हिरावून घेतल्याने परिसरातील बळीराजा पूर्णतः हताश झाला आहे. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे शुक्रवारपासून महसूल मंडलामार्फत थाळनेरचे तलाठी एस. के. मराठे यांनी सुरु केले असून, परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.