प्रदूषण विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:28+5:302021-06-04T04:27:28+5:30
धुळे : लघुउद्योग भारती संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात राज्यातील उद्योजकांना प्रदूषण विषयक परवानग्या आणि परवान्यांबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात ...

प्रदूषण विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन
धुळे : लघुउद्योग भारती संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात राज्यातील उद्योजकांना प्रदूषण विषयक परवानग्या आणि परवान्यांबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.
लघु उद्योग भारतीतर्फे सोमवारी प्रदूषण विषयक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यात उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण नियामक आयोगाच्या नियमानुसार आवश्यक असणाऱ्या नियमांचे सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने परवाना प्रकार व वर्गीकरण, नूतन परवाना (उद्योग स्थापन करताना), उत्पादन सुरू केल्यावर लागणारा परवाना, परवान्याचे नियमित व अनियमित नूतनीकरण याविषयीची विस्तृत माहिती दृकश्राव्य प्रस्तुतीकरणाद्वारे समजावून सांगण्यात आली. उत्पादनांवर आधारित विविध वर्ग उदा. लाल, नारंगी, हिरवा व श्वेत या चारही श्रेणीतील उद्योगांना आवश्यक असणारा परवाना, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता यासह वर्गीकरणानुसार परवान्याला दिली जाणारी मुदत, ठराविक मुदतीनंतर करण्यात येणारे परवाना नूतनीकरण, पोल्युशन इंडेक्स, स्कोर, परवाना व नूतनीकरणाचे शुल्क, उद्योगात केलेल्या गुंतवणुकीनुसार लागणारे शुल्क, ऑनलाईन आवेदन प्रक्रिया, लागणारा कालावधी, परवान्याच्या श्रेणीनुसार परवाना देय कार्यालय व जबाबदार अधिकारी, लॉकडाऊन कालावधीत देण्यात आलेली सूट, आदींविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. लघु उद्योग भारतीचे प्रदूषण व औद्योगिक सुरक्षा विषयक संचालक सदस्य आशिष कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तुती व सखोल मार्गदर्शनामुळे उद्योजकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
व्याख्यानापश्चात नियोजित प्रश्नोत्तरीमध्ये लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदूषण विषयक मानद सल्लागार व विषयतज्ज्ञ माधव कुलकर्णी यांनी उद्योजकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे समाधान केले. व्याख्यानासोबतच परवाना व नूतनीकरण विषयक कार्यशाळा घेण्याचा देखील मानस आहे. परंतु लॉकडाऊनच्या मर्यादेमुळे ते शक्य न झाल्याबद्दल लघु उद्योग भारतीद्वारे धुळे शाखेतर्फे खंत व्यक्त करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या केंद्रीय व राज्यस्तरीय टीममार्फत प्रदूषण विभागाशी संबंधित कार्याबद्दल व व्हिजन डॉक्युमेंट बाबत माधव कुलकर्णी यांनी माहिती दिली. लघु उद्योग भारतीद्वारे आयोजित व्याख्यानात धुळे, अवधान, नरडाणा, मालेगाव, जळगाव, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, विभागीय सचिव समीर साने, व्यवस्थापकीय संचालक राजेश शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्याख्यानाचे सादरीकरण आशिष कुलकर्णी, उद्योजकांच्या प्रश्नांची उत्तरे माधव कुलकर्णी, संचलन वर्धमान सिंगवी व आभार प्रदर्शन राहुल कुलकर्णी यांनी केले.