धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले झाडांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:41 IST2019-06-05T11:40:28+5:302019-06-05T11:41:20+5:30

गेल्या वर्षभरात लावली ९ हजार ८०० वृक्ष, यावर्षीही उपक्रम राबविणार

Guardianship of trees accepted by the students of Agricultural College, Dhule | धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले झाडांचे पालकत्व

धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले झाडांचे पालकत्व

ठळक मुद्देकृषी विद्यालयात झाड दत्तक योजना सुरूप्रत्येक विद्यार्थ्याला दिले १० झाडविद्यार्थ्यांचा मिळतो प्रतिसाद

आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्य शासनातर्फे शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी फक्त वृक्ष लावले जातात. त्या लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी कोणी घेत नाही. मात्र धुळे येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी ९ हजार ८०० झाडी लावली. केवळ झाडे लावण्यावरच ते थांबले नाही तर त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली. त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडी जगली आहेत.
पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राज्यात १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यानुसार दरवर्षी १ जुलै रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडतो. मात्र काही ठिकाणी झाडे लावल्यानंतर त्याला कोणी पाणी देत नाही की ते झाड जगले की नाही हे बघण्याची तसदीही घेतली जात नाही.
मात्र विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी यादृष्टीने कृषी महाविद्यालयात झाडांची दत्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे येथे असलेल्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी व कृषी पदव्युत्तरचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. एकप्रकारे या विद्यार्थ्यांचा पर्यावरणाशीच संबंध असल्याने, महाविद्यालयात ‘झाड दत्तक योजना’ उपक्रम गेल्यावर्षापासून सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला दहा झाडे दत्तक दिलेली आहेत. चार वर्षाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी येथे येत असल्याने, दत्तक घेतलेल्या झाडाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यावरच सोपविण्यात आलेली आहे.
या दहा विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये एक गृप लिडर देण्यात आलेला आहे. काही उणीवा अथवा गरजा असल्यास संबंधित विद्यार्थी या गृप लिडरशी संपर्क साधतो.
या उपक्रमामुळे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गेल्यावर्षात थोडी थोडके नव्हे तर ९ हजार ८०० झाडे लावण्यात आली. यात लिंबू, बांबू, बेल, जांभुळ, निलगिरी आदी वृक्षांचा समावेश आहे. या लावलेल्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जगले आहेत. विद्यार्थीच या झाडांना पाणी देत असतात, झाडांची काळजी घेत असतात.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर शिक्षकवृंदाचेही सहकार्य लाभत आहे.
परिसर हिरवागार होणार
कृषी महाविद्यालयाचा परिसर प्रचंड मोठा आहे. त्यात अगोदरच विविध प्रकारची झाडी लावण्यात आलेली आहे. झाड दत्तक योजनेमुळे त्यात अधिक भर पडून महाविद्यालयाचा परिसर अजून हिरवागार होण्यास मदत होणार आहे.
टॅँकरद्वारे पाणी पुरवठा
लहान रोपट्यांना जगविण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र आॅक्टोबरपासूनच पाण्याची टंचाई भासत असली तरी महाविद्यालयाने टँकरने पाणी आणून त्या झाडांना देत ती जगविली आहेत.
दर दोन महिन्यांनी
अहवाल दिला जातो
विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांच्या स्थितीबद्दलचा अहवाल दर दोन महिन्यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठाला सादर केला जातो. कृषी विद्यापीठ हा अहवाल शासनाला सादर करीत असते, असे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

 

Web Title: Guardianship of trees accepted by the students of Agricultural College, Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे