युवकांमध्ये वाढतेय ‘व्हाइट काॅलर’ची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:34+5:302021-08-22T04:38:34+5:30
धुळ्यात मोटारसायकलचा कट मारला, रागाने बघितले, गुटख्याची फुडी मागितली, फटाके फोडले अशा क्षुल्लक कारणावरून धुळ्यात खून पडले आहे. ...

युवकांमध्ये वाढतेय ‘व्हाइट काॅलर’ची क्रेझ
धुळ्यात मोटारसायकलचा कट मारला, रागाने बघितले, गुटख्याची फुडी मागितली, फटाके फोडले अशा क्षुल्लक कारणावरून धुळ्यात खून पडले आहे. खरेच असे घडू शकते का, असा प्रश्न साहजिकच बातमी वाचणाऱ्याला पडेल; पण धुळेकरांच्या दृष्टीने बघितले तर हो असे होऊ शकते, कारण धुळेकरांसाठी हे नवीन नाही. कारण फुकटात जेवण दिले नाही म्हणून भरदिवसा हवेत गोळीबार करणे, लहान-लहान गोष्टीत देशी कट्टा बाहेर काढणे, अशा घटना धुळेकरांसाठी नित्याची बाब बनली आहे आणि अशा गोष्टी करणारे व्हाइट काॅलर गुंड यांची क्रेझ धुळ्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढतेय. अशा तरुणांचा राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांमधील बसणे उठणे, पोलिसांकडून मिळणारा मानमर्तब पाहून महाविद्यालयीन तरुण हुरळून जातात. मग हेच त्यांच्यासाठी आदर्श बनतात. त्याच्या मागे-पुढे फिरतात, त्यांची बडदास्त ठेवतात. त्यांना त्यांच्या ‘गँग’ मधला म्हणून घेण्यात हे तरुण स्वत:ला धन्य समजतात. मग अशा तरुणांच्या बसण्या, उठण्यात, बोलण्यात आणि चालण्यात एक वेगळी ‘रग’ निर्माण होते. चौकाचौकात मोटारसायकली लावून बसलेल्या अशा तरुणांकडे मग कोणी रागाने बघणे तर दूर त्या चौकातील कोणी दुकानदार त्यांना चुकून गाडी बाजूला लावून उभे राहा, असे बोलण्याची हिम्मतही करणार नाही. तसे केले तर मग विचारच करून ठेवा, मग काही होऊ शकते. यातूनच मग हे तरुण आपल्याला कट मारला, रागाने पाहिले म्हणून धारदार शस्त्राचा वापर करीत हल्ला करणे, धारदार शस्त्राने वार करून जबर मारहाण करणे अशा घटना घडतात. मारहाणीत मग खूनही होतो. अशा घटना धुळ्यात वारंवार होत आहेत. शहरात हा जो ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे, तो समाजासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे. याला कारणीभूत सर्वच घटक आहेत. पोलीस, राजकीय आणि काही अंशी नागरिकसुद्धा आहेत. कारण अशा गुंडांना या सर्वांच्या मूक संमतीने प्रोत्साहन मिळत असते. असे लोक मग राजकारणातही येतात. नेते होतात, मोठी पदे भूषवितात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहराचा औद्योगिक विकास होणेही गरजेचे आहे. जर शहरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग सुरू झाले तर त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, आणि शिकल्यानंतर चौकात कट्ट्यावर टवाळकी करण्यात वेळ घालण्याऐवजी हा तरुण नोकरीला लागेल; पण शहराचा किंवा जिल्ह्याचा औद्योगिक विकास तसा पाहिला तर ‘झीरो’ आहे. शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणी आणि अन्य नागरी सुविधा तर हव्याच; पण सोबतच औद्योगिक विकासही आवश्यक आहे, तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा तरुणांमध्ये निर्माण होणारी अशा गुंडांची क्रेझ कमी होण्याऐवजी वाढतच राहणार आहे. त्यामुळे शहरातील गुंडगिरी आणि गुन्हेगारी ही कमी होण्याऐवजी वाढतच जाणार आहे. म्हणून बुलेटच्या सायलन्सरचा आवाज ज्या पद्धतीने बंद केला त्याप्रमाणे ‘व्हाइट काॅलर’ गुंडांचीही क्रेझ संपली पाहिजे, अशी अपेक्षा आहे.