दहिवद गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 21:56 IST2021-03-14T21:56:09+5:302021-03-14T21:56:18+5:30
हाणामारी झाल्याने तणाव : परस्पर विरोधी फिर्याद, १७ जणांविरुध्द गुन्हा

दहिवद गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद पेटला
धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीची कुरापत काढून दोन गट आमने-सामने भिडल्याने हाणामारी झाली. हा प्रकार शिरपूर तालुक्यातील दहिवद गावात शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पहिल्या गटाकडून विठाबाई जगन्नाथ पाटील (६०, रा. दहिवद, ता. शिरपूर) या वृद्ध महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादाची कुरापत काढून उत्तम जगन्नाथ पाटील आणि किशोर उत्तम पाटील यांना जमावाने एकत्र येऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुपारी पावणे दोन वाजता शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रवींद्र संतोष पाटील, ताराचंद पिरन पाटील, दिनेश ताराचंद पाटील, विलास ताराचंद पाटील, प्रकाश रामभाऊ पाटील, रोहित रवींद्र पाटील, कृष्णा रवींद्र पाटील, आशाबाई रवींद्र पाटील (सर्व रा. दहिवद, ता. शिरपूर) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख घटनेचा तपास करीत आहेत.
दुसऱ्या गटाकडून आशाबाई रवींद्र पाटील (३९, रा. दहिवद, ता. शिरपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीची कुरापत काढून जमावाने एकत्र येत शिवीगाळ केली. हाताबुक्क्याने मारहाण केली. दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी दुपारी साडेचार वाजता फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, चुनीलाल जगन्नाथ पाटील, किशोर जगन्नाथ पाटील, उत्तम जगन्नाथ पाटील, जितेंद्र काशिनाथ पाटील, विठाबाई जगन्नाथ पाटील, वैशाली चुनीलाल पाटील, नवनीत काशिनाथ पाटील, भावना उत्तम पाटील, शीतल किशोर पाटील (सर्व रा. दहिवद, ता. शिरपूर) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, १४३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत.