जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या शेजारील मध्य प्रदेश व गुजरात या राज्यात काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रात किंवा सिंचन प्रकल्पांवर स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य असू शकते. अशा ठिकाणी पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष द्यावे. या भागात पक्षी मृत आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ द्यावी. त्यासाठी गावागावांत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करावी. माहिती मिळाल्यावर पशुसंवर्धन विभागाने मृत पक्ष्याचे नमुने घेऊन त्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी.
जिल्ह्याच्या सीमांवर कुक्कुटवर्गीय पक्ष्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पथकांची नियुक्ती करावी. आवश्यक तेथे पोलिसांची मदत घ्यावी. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यास केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विसावे यांनी सांगितले, बर्ड फ्लू प्रतिबंधक उपाययोजना म्हणून १८ रॅपिड रिस्पॉन्स टीम तालुकानिहाय गठित करण्यात आल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना दैनंदिन अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे सांगितले.