मुलीचा मृत्यू चुकीच्या आॅपरेशनमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:33 IST2020-12-15T21:33:10+5:302020-12-15T21:33:28+5:30
पिंपळनेर : मयत मुलीच्या आईची पोलिसात तक्रार

मुलीचा मृत्यू चुकीच्या आॅपरेशनमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
पिंपळनेर- गरोदर मातेच्या प्रसूती डिलिव्हरी प्रसंगी चुकीच्या आॅपरेशनमुळे मृत्यू झाल्याने पिंपळनेरच्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत गरोदर मातेची आई सुरेखा मोरे यांनी केली आहे़ यासंदर्भात त्यांनी पिंपळनेर पोलिसात तक्रारी अर्ज दिलेला आहे़
सुरेखा यशवंत मोरे यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी सुजाता सुदर्शन जाधव (रा. वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव) ही गरोदर होती़ तिची माहेरी पिंपळनेर येथील डॉ. राहुल तावडे यांच्याकडे पाचव्या महिन्यापासून प्रसुतीपूर्व उपचार सुरू होते. तिला २४ आॅक्टोबर २०२० रोजी प्रसूतिवेदना सुरु झाल्याने डॉ. तावडे यांच्याकडे दाखल केले़ त्यांनी सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर गर्भाशयातील पाणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले़ बाळाला धोका असल्याने सिजर करावेच लागेल असेही ते म्हणाले़ मी मुलीची आई असल्याने नॉर्मल प्रसुतीचा आग्रह धरला पण त्यांनी ऐकले नाही व रात्री आठ वाजता मुलगी सुजाताचे सिजर केले. सिजरपूर्वी माझ्या मुलीस कोणताही आजार नव्हता़ असे सुरेख मोरे यांचे म्हणणे आहे़
आॅपरेशन झाल्यानंतर माझी मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिचे पोट दुखू लागले़ डॉ. तावडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सिजरमुळे दुखत असेल असे सांगितले व त्यांनी औषधोपचार सुरू केला़ मात्र वेदना कमी झाल्या नाहीत़ २६ आॅक्टोबर २०२० रोजी मुलीचे पोट अधिकच फुगले़ पोटाचा घेर वाढत गेला, पुन्हा सोनोग्राफी केली़ डॉ. तावडे यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले़ दि. २६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत दाखल करून, औषध उपचार करून देखील पेशंटला बरे वाटत नव्हते़
धुळे येथील दोन्ही डॉक्टरांनी पेशंट बरे होत नसल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले़ मी मुलीला ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता घाटी रुग्णालयात अॅडमिट केले़ ते सोनोग्राफी करून त्वरित आॅपरेशन करण्याचे सांगितले़ ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता आॅपरेशन केले़ मात्र ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात मुलीची आईने पिंपळनेर येथे डॉ. राहुल तावडे यांनी प्रसूतीपूर्वी केलेल्या आॅपरेशनावेळी काही चुका केल्याने तिचे पोट फुगले व तेथूनच तिची तब्येत खालावली़ धुळे येथील डॉक्टरांनी ऐंशी हजार रुपये बिल घेतले व औषधी तपासनी ६० हजार रुपये व पिंपळनेर येथील डॉ. राहुल तावडे यांनी रुपये ५० हजार घेतले़ मात्र बिल दिले नाही़ एवढे करूनही मुलीचा जीव वाचला नाही़ डॉ. तावडे यांच्या चुकीच्या आॅपरेशनमुळे व धुळे येथील दोन डॉक्टरांच्या निष्काळजीपणा माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार सुरेखा मोरे यांनी केली आहे़