धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कराच्या शास्तीत सूट मिळावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे यांनी आयुक्त अजीज शेख यांना सादर केले आहे़संपूर्ण देशात १ जूनपासून कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने शिथिल करण्याचे काम राज्य सरकारने ठरविले आहे़ कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे धुळे शहरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, बाजारपेठा गेल्या ७४ दिवसांपासून बंद होती़ त्यानंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात शिथिलता दिल्याने १ जूनपासून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सदर दुकाने व व्यवसाय तसेच शासकीय कार्यालय सुरु करण्यास जिल्हा प्रशासनामार्फत परवानगी देण्यात आली आहे़धुळे महापालिकेमार्फत नागरीकांकडून चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर वसुल करताना एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ८ टक्के तर जून महिन्यात ६ टक्के सूट देण्यात येते़ त्यानंतर जुलै महिन्यांपासून दर महिन्याला २ टक्के शास्ती लावण्यात येते़ बहुसंख्य नागरिक हे मालमत्ता कराचा आॅनलाईन भरणा करु शकत नाही़ सद्यस्थिती पाहता धुळे शहरातील नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ त्यामुळे महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी मालमत्ता करात सूट दिल्यास लॉकडाऊन कालावधीत शहरातील जे नागरिक मालमत्ता कर भरु शकलेले नाहीत ते नागरिक मालमत्ता कर भरण्यास पुढे येतील़ त्यामुळे महापालिकेस आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे़ तसेच चालू आर्थिक वर्षासाठी शासनाची योग्य ती रितसर परवानगी घेऊन नागरिकांच्या मालमत्ता करावर कुठल्याही प्रकारची शास्ती लावण्यात येऊ नये़ धुळेकर नागरिकांच्या दृष्टीने वरील काही बाबींचा विचार करुन नागरिकांना नियमानुसार चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात सूट देण्याबाबत आणि शास्तीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा़ त्याची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि तसेच सदरचा प्रस्ताव हा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा अशीही मागणी करण्यात सभापती सुनील बैसाणे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे़स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी आयुक्तांकडे मागणी केल्यानंतर आयुक्त अजिज शेख कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात की हा विषय येणाऱ्या महासभेपुढे सादर करतात याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे़ हा निर्णय घेण्यात आल्यास त्याचा फायदा शेकडो नागरिकांना होणार आहे़
मालमत्ता कराच्या शास्तीत सूट मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:23 IST