Dhule Murder: शहरातील मिल परिसरातील ध्वज चौकात मोबाईल सिमकार्डवर मिळणारे कपबशीचे गिफ्ट ऐवजी हेडफोन देण्याची मागणी रंगारी चाळीत राहणाऱ्या गौरव माने (वय २७) केली. यातून वाद निर्माण झाल्याने पानटपरी चालक जयेश राजेंद्र पाकळे (१९) याने सुऱ्यासारख्या धारदार शस्त्राने गौरवला भोसकल्याचा थरार भरदिवसा दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. यात गौरवचा मृत्यू झाला.
मयत गौरव माने मयत गौरव माने याचा चुलत भाऊ ओम डिगंबर माने याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ध्वज चौकात सोमवारी एका कंपनीचे सिमकार्ड विक्रीचे स्टॉल लागले होते. रंगारी चाळीत राहणारा मयत गौरव माने याने स्टॉलधारकाला गिफ्टमध्ये कपबशी ऐवजी हेडफोन देण्याची मागणी केली. यावेळी स्टॉलधारक आणि चौकातील पानटपरी चालक जयेश पाकले याच्याशी त्याचा वाद झाला. त्यानंतर गौरव तेथून घरी निघून गेला. तो दुपारी १ वाजता पुन्हा चौकात आला. तेव्हा पानटपरी चालक जयेश पाकळे त्याचे वडील राजेंद्र पाकळे (४५) आणि मोठा भाऊ ओम पाकळे (२१) या तिघांनी गौरवला मारहाण केली आणि जयेशने सुऱ्यासारख्या धारदार शस्त्राने गौरवला भोसकले. गौरव रक्ताच्या थरोळ्यात पडला असताना तिघे संशयित आरोपी तेथून फरार झाले.
दरम्यान, पोलीस तीन आरोपींचा शोध घेत आहेत.