रहिमपुरा गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 15:47 IST2021-04-29T15:47:03+5:302021-04-29T15:47:41+5:30
दोन घरे जळून खाक, संसारोपयोगी साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान

रहिमपुरा गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी टळली
दोडाईचा : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन रहिवाशी घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे येथे बुधवारी रात्री घडली. यात किमान २१ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ सुदैवाने जीवितहानी टळली़
शिंदखेडा तालुक्यातील रहीमपूरे येथे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास निंबा नथा पाटील व विश्वास गोरख पाटील यांचा राहत्या घराला आग लागली़ निंबा नथा पाटील यांचे २ लाख १० हजार रुपये किमतीचे घर जळून खाक झाले. घरातील आगीत ७ लाख रुपयांची रोकड, १ लाख २० हजार रुपये किमतीचे २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० हजार रु किमतीचा टीव्ही, फ्रीज, फॅन व १३ हजार रुपये किमतीचे हरभऱ्याचे बियाणे, २ लाख १० हजार रुपये किमतींच्या घरातील वस्तू आगीत जळून खाक झाल्यात. आगीत निंबा पाटील यांचे घरासह १२ लाख ८३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच याच घराला लागून विश्वास गोरख पाटील यांचे घर होते. या आगीत २ लाख १० हजार रु किमतीचे घर, १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ३० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ तोळे सोन्याचे दागिने, ३० हजार रु किमतीची ५ ग्रॅमची अंगठी, १३ हजार रु किमतीची चक्की, ३० हजार रु किमतीचा फ्रीज, टिव्ही, ५ हजार रु किमतीचा फवारणी पंप, १ लाख ९० हजार रु किमतीचे घरघुती व गृहपयोगी साहित्य, २२ हजार ८०० रुपये किमतीचे रासायनिक खत आगीत जळून खाक झाले. आगीत विश्वास पाटील यांचे ८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन्ही घरे व घरातील साहित्य आगीत जळून २१ लाख २५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अपर तहसीलदार सुदाम महाजन, कामराज निकम, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, सर्कल महेशकुमार शास्त्री आदींनी घटना स्थळी भेट दिली. दोंडाईचा व शिंदखेडा येथील अग्निशमन बंबाने आग विझवली. दरम्यान दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्म झालीत. गुरुवारी तलाठी दीपक ईशी यांनी पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अंदाज केला.