वाहनाच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:52 IST2019-05-20T11:51:43+5:302019-05-20T11:52:16+5:30

वडजाई : अमरधाममध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने गैरसोय

Funeral in the light of the vehicle | वाहनाच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

वडजाई येथील अमरधाममध्ये रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनाच्या प्रकाशात असे अंत्यसंस्कार उरकावे लागतात.

वडजाई : थुळे तालुक्यातील वडजाई येथील अमरधाममध्ये लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास एखादे चारचाकी वाहन बोलावून त्याचे दिवे लावून त्या प्रकाशात किंवा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. यामुळे संतप्त प्रतिक्रीया उमटत   आहेत. 
वडजाई येथील अमरधाममध्ये मोठ्या प्रमाणावर दुरवस्था असल्याने अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अमरधाममध्ये छत नसल्यामुळे रणरणत्या उन्हात नातेवाईकांना उभे राहावे लागत आहे. वडजाई येथील अमरधाममध्ये ग्रामपंचायतीकडून साधी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यास रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करावे लागतात. अशावेळी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. वडजाई येथील एका महिलेचे उपचारादरम्यान नाशिक येथे निधन झाले. तेथून शव येईपर्यंत रात्र झाली. मात्र, अमरधाममध्ये लाईट नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी चारचाकी वाहनाचे लाईट व मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागते. 
अमरधामजवळ हाकेच्या अंतरावर विजेचे कनेक्शन असलेला पोल आहे. परंतू एक लाईट लावण्याची तसदी ग्रामपंचायतीने घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अमरधाममध्ये बसण्यासाठी ओटा आहे. परंतू शेड नसल्यामुळे आलेल्या नातेवाईकांना उन्हात उभे राहावे लागत आहे. या परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आलेली नाही. या ठिकाणी साफसफाई होत नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून येते. ग्रामपंचायतीने अमरधाममध्ये त्वरित लाईटची व्यवस्था करावी. अमरधामच्या शेडसाठी निधी उपलब्ध करुन दुरवस्था दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Web Title: Funeral in the light of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे