केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:52+5:302021-03-28T04:33:52+5:30
वडजाईसह परिसरात पाणी अडविण्यासाठी एकमेव मोठा के. टी. वेअर बंधारा आहे. डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर रानमळा धरण भरून ...

केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा
वडजाईसह परिसरात पाणी अडविण्यासाठी एकमेव मोठा के. टी. वेअर बंधारा आहे. डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर रानमळा धरण भरून ओव्हर फ्लो झाल्यानंतर हे केटीवेअरमध्ये पाणी येत असते. नरव्हाळ, वडजाई परिसरात पाणी अडविण्यासाठी लहानलहान बंधारे आहेत; परंतु त्यामध्ये पाणी साठवणूक क्षमता अल्प प्रमाणात आहे, म्हणून ते पावसाळ्यानंतर लगेच कोरडे होतात. नरव्हाळ व वडजाई गावाच्या मध्यभागी अनवर नाल्यावर हा केटीवेअर आहे. याची पाण्याची साठवण क्षमता मोठी आहे; परंतु या केटीवेअर बंधाऱ्याला पश्चिम दिशेने किनाऱ्याला व मध्यभागी अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बंधाऱ्यात पाणी असते त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या विहिरींना होतो. बारमाही पाणी उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही उत्पन्न घेत असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असते; परंतु सध्याच्या परिस्थितीत या केटीवेअरला पावसाळ्यात पाणी असते. पावसाळा संपला की गळतीमुळे पाणी वाहून जाते. आठ महिना बंधारा कोरडाठाक पडलेला असतो. परिसरात पाणी अडविण्यासाठी मोठा बंधारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नाही. तालुक्याचे लोकप्रतिनिधी पी. डब्ल्यूडी विभागाने बंधारा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन बंधाऱ्याची गळती थाबवावी अशी मागणी शेतकरी रामकृष्ण पाटील मनोज शिंदे संतोष देवरे सुकदेव शिंपी, शरद देवरे, विठ्ठल देवरे, कैलास बाविस्कर, संजय पाटील आदी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.