फरार आरोपी जळगावला जेरबंद धुळ्याच्या पथकाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 22:35 IST2020-07-26T22:35:15+5:302020-07-26T22:35:35+5:30
न्यायालयीन होता बंदिवान : खून प्रकरणातील संशयित

फरार आरोपी जळगावला जेरबंद धुळ्याच्या पथकाची कामगिरी
धुळे : खून प्रकरणातील संशयित धुळ्यातील तात्पुरता कारागृहात ठेवण्यात आले होते़ खिडकीचे गज तोडून फरार झालेल्या संशयिताला धुळ्याच्या पथकाने जळगाव येथे जावून अटक केली़ सुरेश जुमान पावरा असे त्या संशयिताचे नाव आहे़
शिरपुरातील करवंद नाक्यावर दोन महिन्यापुर्वी एकाचा खून केल्याप्रकरणी सुरेश जुमान पावरा (रा़ जुना करवंद रोड, कळमसरे ता़ शिरपूर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याला धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातंर्गत तात्पुरते कारागृह जिजामाता कन्या हायस्कूल येथे ठेवण्यात आले होते़ तो न्यायालयीन बंदिवान होता़ २२ जून २०२० रोजी पहाटे २ ते अडीच वाजेच्या सुमारास खिडकीचे गज तोडून तो फरार झाला होता़ पुन्हा त्याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याचा शोध सुरु असतानाच तो जळगाव येथे येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ माहिती मिळताच पथकाने जळगाव येथे जावून सुरेश जुमान पावरा याच्या मुसक्या आवळल्या़ त्याला ताब्यात घेऊन धुळ्यात आणण्यात आले़ त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, तपास पथकाचे कर्मचारी मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, अविनाश कराड, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, सचिन पगारे यांनी ही कारवाई केली़