कोरोना लस विकत की फुकट, सर्वसामान्यांना उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:04 IST2020-12-14T22:03:49+5:302020-12-14T22:04:11+5:30
वार्तापत्र : सुनील बैसाणे कोवीड १९ लसीकरणासाठी गठीत टास्क फोर्सची बैठक गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत कोरोना ...

dhule
वार्तापत्र : सुनील बैसाणे
कोवीड १९ लसीकरणासाठी गठीत टास्क फोर्सची बैठक गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत कोरोना लसीकरणाची पुर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यंत्रणेला दिल्या. तसेच लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होईल याची खात्री करावी, तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करावा, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलीस, शिक्षण, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजकल्याणसह शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे असे मार्गदर्शनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणाचे चार टप्पे केले आहेत. कोवीडची लस आल्यावर प्रथम आरोग्य कर्मचारी, काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत कर्मचारी अर्थात फ्रंटलाईन कर्मचारी, ५० वर्षावरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेले रुग्ण यांना लसीकरण केले जाईल. पहिल्या टप्प्यात ९ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ७३ शासकीय व १९९ खासगी आरोग्य संस्था आहेत. तसेच शीतसाखळी अबाधित राखण्यासाठी ६२ आयएलआर व ६१ डीप फ्रीजर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा लस भांडारगृह देखील आहे. एकूणच लस साठविण्याची क्षमता धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती या आढावा बैठकीतून पुढे आली. तालुक्याच्या ठिकाणी लस पोहोचविण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत. भारतात तीन कंपन्यांमध्ये कोरोना लसीची निर्मिती होत आहे. त्यात भारत बायोटेक, सीरम या कंपन्यांचा समावेश आहे. मार्च, एप्रिल महिन्यात लसीकरणाचा सुरूवात होईल अशी शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चार प्रकारच्या लस तयार केल्या जात आहेत. त्यापैकी कोणती लस देण्याचा निर्णय सरकार घेवू शकते याबाबत अजुनही निश्चित कल्पना नाही. शिवाय कोरोनाची लस मोफत आहे किंवा ती विकत घ्यावी लागेल याबाबत देखील शासनाचे दिशानिर्देश अजुनही प्राप्त झाले नसल्याने प्रशासन देखील संभ्रमात आहे. दुसरीकडे प्राधान्याने चार टप्पे पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लस कधी उपलब्ध होईल याची उत्सुकता लागली आहे. परंतु त्याबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही.